अनाकलनीय डावपेच, प्रत्येक लढतीत होणाऱ्या चुकांचीच पुनरावृत्ती करत मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाविरुद्ध पराभव ओढवून घेतला. विशेष म्हणजे दिल्लीकडून खेळणाऱ्या २० वर्षीय मुंबईकर श्रेयस अय्यरनेच मुंबई इंडियन्सच्या पराभवाची वीट रचली. अय्यर आणि जे पी डय़ुमिनी यांच्या दीडशतकी भागीदारीच्या जोरावर दिल्लीने १९० धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मुंबई इंडियन्सने नियमित अंतराने विकेट्स गमावल्या. त्यांनी १५३ धावांची मजल मारली आणि दिल्लीने ३७ धावांनी विजय साकारला.
प्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांनी संयमी सलामी दिली. मात्र त्यानंतर ते दोघेही तंबूत परतले. सिमन्सने १५ तर पार्थिवने २८ धावा केल्या. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात उन्मुक्त चंद (१४) यष्टीचीत झाला. मिश्रानेच पोलार्डची खेळी झटपट संपुष्टात आणली. रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू जोडीने ४९ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वाढत्या धावगतीमुळे रोहितने फटक्यांची पोतडी उघडली. असाच एक फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित नॅथन कोल्टिअर-नीलच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने ३० धावांची खेळी केली. इम्रान ताहीरने हार्दिक पंडय़ा, अंबाती रायुडू आणि मिचेल मॅक्लेघान या तिघांना एकाच षटकात बाद करत मुंबईच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आणल्या. मुंबईने १५३ धावा केल्या. दिल्लीकडून इम्रान ताहीरने ३ बळी घेतले.
तत्पूर्वी, जे पी डय़ुमिनी आणि श्रेयस अय्यर यांच्या तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने १९० धावांचा डोंगर उभारला. मयांक अगरवाल एक धाव काढून तंबूत परतला. अनुभवी डय़ुमिनीने अय्यरला हाताशी घेत दुसऱ्या विकेटसाठी १५४ धावांची भागीदारी केली. एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार-षटकार यांची सुरेख सांगड घालत या जोडीने मोठय़ा धावसंख्येची पायाभरणी केली. शतकाकडे कूच करणाऱ्या श्रेयसला लसिथ मलिंगाने बाद केले. त्याने ५६ चेंडूंत ७ चौकार आणि ५ षटकारांसह ८३ धावांची खेळी केली. अँजेलो मॅथ्यूजने ३ चौकारांसह १७ धावा केल्या. यंदाच्या हंगामात सर्वाधिक बोली मिळवणारा अनुभवी अष्टपैलू युवराज या सामन्यातही अपयशीच ठरला. त्याला केवळ २ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहने त्याला बाद केले. डय़ुमिनीने ५६ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७८ धावांची खेळी साकारली. मुंबई इंडियन्सतर्फे मिचेल मॅक्लेघानने २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १९० (श्रेयस अय्यर ८३, जेपी डय़ुमिनी ७८; मिचेल मॅक्लेघान २/३८) विजयी विरुद्ध मुंबई इंडियन्स : २० षटकांत ९ बाद १५३ (अंबाती रायुडू ३०, रोहित शर्मा ३०; इम्रान ताहीर ३/२२)
सामनावीर : श्रेयस अय्यर.