अ‍ॅलन डोनाल्ड हे माझे आदर्श द्रुतगती गोलंदाज आहेत आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मला खेळण्याची संधी मिळत आहे हे माझे मोठे भाग्यच आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेत सर्वोत्तम कामगिरी करीन असा आत्मविश्वास पुणे वॉरियर्सचा द्रुतगती गोलंदाज अभिषेक नायर याने येथे व्यक्त केला.
मुंबईकडून प्रथम दर्जाचे सामने खेळणाऱ्या अभिषेकने २००८ ते २०१० या कालावधीत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्याला २०११-१२ च्या आयपीएलकरिता किंग्ज इंडियन पंजाबने करारबद्ध केले होते. यंदाच्या आयपीएलमध्ये तो पुणे संघाकडून खेळत आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना नायर म्हणाला, मला गोलंदाजीबाबत डोनाल्ड यांचे मार्गदर्शन मिळणार असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. डोनाल्ड हे सर्वोत्तम द्रुतगती गोलंदाज आहेत. दिशा व टप्पा यावर नियंत्रण ठेवीत भेदक गोलंदाजी कशी करावयाची याबाबत मला त्यांच्याकडून मौलिक सूचना मिळत आहेत. त्यामुळे माझ्या गोलंदाजीत सुधारणा होईल अशी मला खात्री आहे.
भारतीय संघात पुन्हा स्थान मिळविण्यासाठी मी उत्सुक असून या स्पर्धेतील अनुभवाचा फायदा मी घेणार आहे. भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा वाढलेली आहे याची मला जाणीव आहे. तथापि आयपीएल स्पर्धेत अनेक नामवंत फलंदाजांसमोर मी गोलंदाजी करणार आहे. त्यामध्ये मला अनेक बारकावे शिकण्यास मिळतील. ही शिकवणीची शिदोरी मला भावी कारकीर्दीसाठी उपयुक्त होईल असेही नायर याने सांगितले.
मायकेल क्लार्क यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंसमवेत खेळण्यासाठी मी खूप उत्सुक झालो होतो मात्र ते खेळू शकणार नसल्यामुळे त्यांची अनुपस्थिती मला व आमच्या संघास निश्चित जाणवणार आहे. तरीही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा आमच्या संघातील सर्वच खेळाडूंचा मानस आहे, असे नायर म्हणाला.