चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध विजयासाठी पुरेपूर प्रयत्न करूनही कोलकाता नाइट रायडर्सना पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्यांच्यापुढे आव्हान आहे ते दिल्लीचे तख्त फोडण्याचे. रायपूरचे नवे कोरे मैदान दिल्लीचे घरचे मैदान असून पुणे वॉरियर्सला नमवल्यानंतर आता नाइट रायडर्सशी दोन हात करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.
चांगली सुरुवात केल्यानंतर नाइट रायडर्सची मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली आहे. फलंदाजीत गौतम गंभीर, जॅक कॅलिस, इऑन मॉरगन यांच्यावर कोलकात्याची भिस्त आहे. मनोज तिवारी दुखापतग्रस्त असल्याने, तर युसूफ पठाणला सूर गवसत नसल्याने कोलकाता नाइट रायडर्सच्या चिंता वाढल्या आहेत. ब्रेंडान मॅक्युल्लमकडून धडाकेबाज खेळीची त्यांना अपेक्षा आहे. दिल्लीसाठीही परिस्थिती फार वेगळी नाही. वीरेंद्र सेहवाग, महेला जयवर्धने आणि डेव्हिड वॉर्नर असे एकापेक्षा एक फलंदाज ताफ्यात असूनही दिल्लीची फलंदाजी बहरलेली नाही. उन्मुक्त चंद आणि मनप्रीत जुनेजा या युवा खेळाडूंकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे.
गोलंदाजीत कोलकाता नाइट रायडर्स सुनील नरिनच्या फॉर्मवर अवलंबून आहेत. जॅक कॅलिसही गोलंदाजीचा भारही सांभाळत आहे. मात्र या दोघांना रजत भाटिया, लक्ष्मीपती बालाजी, सचित्रा सेनानायके यांची सातत्याने साथ मिळणे आवश्यक आहे. रायपूरची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साहाय्यकारी असल्याने सेनानायकेच्या जागी ब्रेट लीचे संघात पुनरागमन होऊ शकते.
दुसरीकडे दिल्लीला गोलंदाजीत आमूलाग्र सुधारणा करावी लागणार आहे. उमेश यादव विकेट्स तसेच धावा रोखण्याचे काम चोख करत आहे, मात्र इरफान पठाण, आशीष नेहरा, अजित आगरकर, आंद्रे रसेल यांचे अपयश दिल्लीच्या पराभवाचे कारण ठरत आहे.
जीवन मेंडिस, जोहान बोथा तसेच रोलेफ व्ॉन डर मव्‍‌र्ह हे विदेशी खेळाडूही छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत. शाहबाज नदीमची फिरकी दिल्लीचे नशीब पालटवू शकते.
गुणतालिकेतील घसरण थांबवून बादफेरीत आगेकूच करायची असेल तर कोलकात्याला उर्वरित सामन्यांमध्ये दमदार कामगिरी करणे अत्यावश्यक आहे.