*  चेन्नई सुपर किंग्सवर २४ धावांनी सहज विजय
*  आरोन फिन्चचे अर्धशतक, स्टीव्हन स्मिथची खेळी मोलाची
*  घरच्या मैदानावर सुपर किंग्सचा पराभव
घरच्या मैदानावर शेर समजल्या जाणाऱ्या महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला पुणे वॉरियर्सकडून सोमवारी धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. गुणतालिकेत तळाच्या स्थानी असणाऱ्या आणि सातत्याचा अभाव असणाऱ्या पुणे वॉरियर्सने चेन्नईला २४ धावांनी नमवत आपणच ‘सुपर किंग’ असल्याचे दाखवून दिले. आरोन फिन्च आणि स्टीव्हन स्मिथच्या वेगवान खेळीच्या जोरावर पुण्याने चेन्नईसमोर १६० धावांचे आव्हान ठेवले. त्यानंतर शिस्तबद्ध गोलंदाजी करून सातत्याने विकेट्स घेत पुण्याने चेन्नईला २० षटकांत १३५ धावांवरच रोखले.
हे आव्हान पेलताना माइक हसीच्या जागी संघात स्थान मिळालेला श्रीकांत अनिरुद्ध पहिल्याच षटकांत बाद झाला. सुरेश रैना आणि मुरली विजयही फार चमक दाखवू शकले नाहीत. एस. बद्रीनाथ आणि रवींद्र जडेजा यांनी चौथ्या विकेटसाठी ४६ धावा जोडत डाव सावरला. मात्र मिचेल मार्शने या दोघांना तंबूत धाडत चेन्नईला अडचणीत आणले. धावगतीचे दडपण वाढल्याने फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नांत ड्वेन ब्राव्हो आणि धोनी माघारी परतले आणि चेन्नईच्या विजयाच्या आशा मावळल्या. आल्बी मॉर्केल खेळपट्टीवर अवतरला तेव्हा चेन्नईसाठीचे आव्हान अशक्यप्राय झाले होते. पुण्याच्या सर्वच गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. भुवनेश्वर कुमार, अशोक दिंडा आणि मिचेल मार्शने प्रत्येकी २ बळी टिपले.
तत्पूर्वी, पुणे वॉरियर्सने फिन्चच्या तडाखेबंद ६७ धावांच्या खेळीच्या जोरावर पुण्याला तडाखेबंद सुरुवात करून दिली. चेन्नईत सामना असल्याने वॉरियर्सचा कर्णधार आणि श्रीलंकेचा खेळाडू अँजेलो मॅथ्यूजला बाहेर बसावे लागले. मॅथ्यूजच्या अनुपस्थितीत रॉस टेलरने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. फिन्च आणि रॉबिन उथप्पा या जोडीने पुण्याला ९६ धावांची खणखणीत सलामी दिली. यात फिन्चचा वाटा होता ६७ धावांचा तर उथप्पाचा केवळ २४ धावांचा. १० चौकार आणि २ षटकारांच्या साह्य़ाने फिन्चने चेन्नईच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. फिन्च चेन्नईकरता डोकेदुखी ठरणार, असे वाटत असतानाच रवींद्र जडेजाने त्याला बाद केले. साथीदार बाद होताच उथप्पाचाही संयम सुटला आणि तो ख्रिस मॉरिसच्या गोलंदाजीवर जडेजाकडे झेल देऊन माघारी परतला. तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या रॉस टेलरला ड्वेन ब्राव्होने फसवले. टेलरने फक्त ८ धावा केल्या. मिचेल मार्शही २ धावा करून बाद झाला. मात्र स्पर्धेत पहिल्यांदाच संधी मिळालेल्या स्टीव्हन स्मिथने १६ चेंडूत ३९ धावांची तुफानी खेळी केली. त्याने ३ षटकार आणि ३ फटकावले. स्टीव्हन स्मिथच्या खेळीच्या आधारावरच पुण्याने १५९ धावांची मजल मारली. चेन्नईतर्फे ख्रिस मॉरिस आणि ड्वेन ब्राव्होने प्रत्येकी २ बळी टिपले.
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ५ बाद १५९ (एरॉन फिन्च ६७, स्टीव्हन स्मिथ नाबाद ३९, रॉबिन उथप्पा २६, ख्रिस मॉरिस २/२५) विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ८ बाद १३५ (एस. बद्रीनाथ ३४, रवींद्र जडेजा २७; भुवनेश्वर कुमार २/१२, अशोक दिंडा २/३४).
सामनावीर : स्टीव्हन स्मिथ