रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या साखळीतील अखेरच्या टप्प्यात आपल्या झंझावाती कामगिरीने एकेका प्रतिस्पध्र्याची दुर्दशा करीत आहे. चार दिवसांपूर्वी बंगळुरूने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पंजाबला हरवताना ख्रिस गेलने (११७) रौद्ररूप धारण केले होते. रविवारी वानखेडे स्टेडियम ए बी डी’व्हिलियर्स (नाबाद १३३) मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा कर्दनकाळ ठरला. डी’व्हिलियर्सच्या वादळी खेळीच्या बळावर बंगळुरूने मुंबई इंडियन्सवर ३९ धावांनी शानदार विजय मिळवला आणि आयपीएल गुणतालिकेत एकंदर १३ गुणांसह सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईकडून लेंडल सिमन्सने सामना वाचवण्यासाठी अर्धशतकी खेळीसह एकाकी झुंज दिली.
वानखेडेवर क्रिकेटरसिकांना चौकार-षटकारांची बरसात पाहायला मिळाली. बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १ बाद २३५ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारत प्रतिस्पध्र्यावर दडपण आणले. मिचेल मॅक्लॅघनने टाकलेल्या तिसऱ्या षटकात मुंबईने दोन जीवदाने दिली. तीच त्यांना महागात पडली. चौथ्या चेंडूवर ख्रिस गेलचा झेल रोहित शर्माने सोडला, तर पाचव्या चेंडूंवर हरभजन सिंगने विराट कोहलीचा झेल सोडला. मुंबईच्या सुदैवाने स्फोटक फलंदाज गेलचा (१३) अडसर लसिथ मलिंगाने दूर केला. परंतु त्यानंतर मात्र डी’व्हिलियर्सने कोहलीला सोबतीला घेऊन मुंबईच्या क्षेत्ररक्षकांवर अधिराज्य गाजवले. डी’व्हिलियर्सने जसप्रीत बुमराहच्या १७व्या षटकात मिडविकेटला षटकार खेचून शतक पूर्ण केले. या षटकात त्याने तीन षटकारांसह २५ धावांची लयलूट केली. डी’व्हिलियर्सने १९ चौकार आणि ४ षटकारांनिशी ५९ चेंडूंत नाबाद १३३ धावांची खेळी साकारून मुंबईकरांना खूश केले. तर कोहलीने त्याला सुरेख साथ देत ५० चेंडूंत ६ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा केल्या. या जोडीने बुमराहच्या ४ षटकांत ५२ आणि हार्दिक पंडय़ाच्या ३ षटकांत ५१ धावा केल्या.
प्रत्युत्तरादाखल मुंबई इंडियन्सला निर्धारित षटकांमध्ये ७ बाद १९६ धावा करता आल्या. या धावसंख्येत ५३ चेंडूंत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ६८ नाबाद धावा काढणाऱ्या सिमन्सचे महत्त्वाचे योगदान होते. सिमन्स आणि किरॉन पोलार्ड (४९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३७ चेंडूंत ७० धावांची वेगवान भागीदारी रचून मुंबईच्या विजयाच्या आशा निर्माण केल्या. मात्र पोलार्ड बाद झाल्यावर सिमन्सला समोरच्या बाजूने फटकेबाजी करणारा साथीदार मिळाला नाही आणि ठराविक अंतराने त्यांचे फलंदाज बाद होत गेले.

आयपीएलमधील सर्वोच्च भागीदारी
ए बी डी’व्हिलियर्स आणि विराट कोहली यांनी १०२ चेंडूंत दुसऱ्या विकेटसाठी २१५ धावांची भागीदारी नोंदवली. ही आयपीएलच्या आजवरच्या इतिहासातील कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली. २०११मध्ये धरमशाला येथे किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि शॉन मार्श यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध २०६ धावांची भागीदारी केली होती. डी’व्हिलियर्स-कोहली जोडीने ही भागीदारी मोडित काढली.

संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : २० षटकांत १ बाद २३५ (ए बी डी’व्हिलियर्स नाबाद १३५, विराट कोहली नाबाद ८२;  लसिथ मलिंगा १/२७) विजयी वि. मुंबई इंडियन्स : २० षटकांत ७ बाद १९६ (लेंडल सिमन्स नाबाद ६८, किरॉन पोलार्ड ४९; हर्षल पटेल २/३६, युझवेंद्र चहल २/५१)
सामनावीर : ए बी डी’व्हिलियर्स.