साखळी फेरीचा अडथळा पार केल्यावर आता स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे. आतापर्यंतच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने ‘क्वालिफायर-१’मध्ये धडक मारली असून हा सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचण्याचेच लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. घरच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात त्यांच्यापुढे गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या चेन्नई सुपर किंग्जचे आव्हान असून या विजयासह त्यांना थेट अंतिम फेरीत पोहोचता येईल.
‘क्वालिफायर-१’मध्ये अव्वल क्रमांकावर असलेला चेन्नई आणि दुसऱ्या स्थानावरील मुंबई यांच्यामध्ये सामना होईल. हा सामना जो जिंकेल त्याला थेट अंतिम फेरीत प्रवेश करता येईल. पण जो संघ पराभूत होईल, त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार नाही. कारण यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये एलिमिनेटरचा सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याशी ‘क्वालिफायर-१’मधील पराभूत संघाचा सामना होईल आणि यांच्यामध्ये जो संघ विजयी ठरेल तो अंतिम फेरीत पोहोचेल.
मुंबईच्या संघाने गेल्या काही सामन्यांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. मिचेल मॅक्लेघन आणि लसिथ मलिंगा यांनी सातत्यपूर्ण भेदक मारा करीत प्रतिस्पर्धी संघावर कायम अंकुश ठेवला आहे. युवा फिरकीपटू जगदीश सुचितने आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवत अप्रतिम गोलंदाजीचा नमुना पेश केला आहे. हरभजन सिंगला मात्र कामगिरीमध्ये सातत्य ठेवता आलेले नाही. किरॉन पोलार्ड हा मुंबईसाठी हुकमी एक्का असेल. फलंदाजीमध्ये लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांना झोकात सुरुवात करून देता आली नसली तरी त्यांनी संयतपणे सलामी देण्याचे काम चोख बजावले आहे. हार्दिक पंडय़ाने आक्रमक फलंदाजी करीत संधीचे सोने केले आहे, त्यामुळे त्याच्याकडून आता अपेक्षा नक्कीच वाढलेल्या असतील. कर्णधार रोहित शर्मा आणि अंबाती रायुडू यांना मात्र अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. कारण गेल्या बऱ्याच सामन्यांमध्ये त्यांना मोठी खेळी साकारता आलेली नाही.
चेन्नईच्या संघाचा विचार केल्यास ब्रेंडन मॅक्क्युलमच्या जागी माइक हसीला संधी मिळू शकते. सुरेश रैना, ड्वेन स्मिथ, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्याकडे क्षमता असली तरी त्यांना सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये आशीष नेहरा हा संघाला झोकात सुरुवात करून देत असून ड्वेन ब्राव्हो हा अखेरच्या षटकांमध्ये अचूक आणि भेदक मारा करण्यात यशस्वी ठरत आहे.
दोन्ही संघांचा विचार केला तर कागदावर चेन्नईचा संघ हा मुंबईपेक्षा वरचढ वाटत आहे, पण सध्याच्या फॉर्मचा विचार केला तर मुंबईचा संघ चेन्नईच्या संघाला पराभूत करून अंतिम फेरीत पोहोचू शकतो, असे म्हटले जात आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा. पासून
थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.