शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या रोमांचक मुकाबल्यात चेन्नई सुपर किंग्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर एका धावेने विजय मिळवला. घरच्या मैदानावर अपराजित राहण्याची परंपरा चेन्नईने नव्या हंगामातही कायम राखली. आशिष नेहरा या विजयाचा शिल्पकार ठरला. दिल्लीच्या अ‍ॅल्बी मॉर्केलचा एकहाती सामना जिंकून देण्याचा प्रयत्न अपयशीच ठरला.
चेन्नईने अडखळत दीडशे धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना दिल्लीने १४९ धावा केल्या.  
माफक आव्हानाचा पाठलाग करताना मयांक अगरवाल, मुरलीधरन गौतम आणि श्रेयस अय्यर तिघेही आशिष नेहराच्या झंझावातासमोर निष्प्रभ ठरले. ३ बाद ३९ अशा स्थितीत सापडलेल्या दिल्लीला अ‍ॅल्बी मॉर्केलने सावरले. केदार जाधवला हाताशी घेत मॉर्केलने चौथ्या विकेटसाठी ४८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मोहित शर्माने केदार जाधवला बाद केले. त्याने २० धावा केल्या. यंदाच्या हंगामात लिलावात सर्वाधिक बोली मिळवलेला युवराज सिंग सपशेल अपयशी ठरला. त्याने केवळ नऊ धावा केल्या. कर्णधार जेपी डय़ुमिनी पाच धावा करूनच तंबूत परतला. अ‍ॅल्बी मॉर्केलने ७३ धावांची एकाकी झुंज दिली. शेवटच्या षटकात १९ धावा आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर ६ धावांचे आव्हान असताना मॉर्केलने चौकार खेचला, मात्र तो दिल्लीला विजयासाठी पुरेसा नव्हता. चेन्नईतर्फे आशिष नेहराने सर्वाधिक ३ बळी घेतले आणि सामनावीर पुरस्कार पटकावला.
तत्पूर्वी, नियमित अंतरात विकेट्स गमावणाऱ्या चेन्नईने दीडशे धावांची मजल मारली. विश्वचषकात झंझावाती फॉर्ममध्ये असणाऱ्या ब्रेंडन मॅक्क्युलम चार धावा करून तंबूत परतला. चेन्नईचा आधारस्तंभ सुरेश रैना चार धावांवरच बाद झाला. ड्वेन स्मिथ आणि फॅफ डू प्लेसिस यांनी ३३ धावांची भागीदारी करत डाव सावरला. इम्रान ताहीरने स्मिथला बाद करत ही जोडी फोडली. त्याने ३४ धावा केल्या. रवींद्र जडेजाला पुढे पाठवण्याचा निर्णय चेन्नईसाठी फलदायी ठरला नाही. डू प्लेसिस स्थिरावलाय वाटत असतानाच डय़ुमिनीने त्याला माघारी धाडले. त्याने ३२ धावांची खेळी केली. अमित मिश्राच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जडेजाचा प्रयत्न फसला. त्याने केवळ १७ धावा केल्या. महेंद्रसिंग धोनीने एका बाजूने किल्ला लढवत चेन्नईला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याने ३० धावा केल्या. दिल्लीतर्फे नॅथन कोल्टिअर नीलने ३ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक :
चेन्नई सुपर किंग्स : २० षटकांत ७ बाद १५० (ड्वेन स्मिथ ३४, फॅफ डू प्लेसिस ३२, महेंद्रसिंग धोनी ३०, नॅथन कोल्टिअर नील ३/३०) विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ९ बाद १४९ (अ‍ॅल्बी मॉर्केल ७३, केदार जाधव २०, आशिष नेहरा ३/२५)
सामनावीर : आशिष नेहरा