मोझेस हेन्रिक्सची धडाकेबाज फलंदाजी आणि फिरकीपटू कर्ण शर्माच्या भेदक माऱ्याच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने दिल्ली डेअरडेव्हिल्सवर सहा धावांनी विजय मिळवत आपले आव्हान कायम राखले. अर्धशतकवीर केदार जाधवचे दिल्लीला जिंकवण्यासाठीचे प्रयत्न व्यर्थ ठरले. या पराभवामुळे दिल्लीचे आव्हान संपुष्टात आले असून  हैदराबादने गुणतालिकेत चौथ्या स्थानावर कूच केली आहे.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना क्विंटन डी कॉकने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५० धावांची खेळी साकारत संघाला दणदणीत सुरुवात करून दिली, पण अन्य फलंदाजांना त्याला साथ देण्यात अपयश आले. कर्णला मोठा फटका मारण्याच्या नादात डी कॉक यष्टीचीत होऊन तंबूत परतला आणि त्यानंतर त्यांची ४ बाद ६६ अशी अवस्था झाली. यानंतर केदारने ३४ चेंडूंत ८ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यामध्ये त्याला अपयश आले.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्यांची २ बाद ३१ अशी सुरुवातीला अवस्था झाली. पण त्यानंतर हेन्रिक्सने ४६ चेंडूंमध्ये एक चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७४ धावांची खेळी साकारत संघाला १६३ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ४ बाद १६३ (मोझेस हेन्रिक्स ७४; नॅथन कल्टर-निल २/२५) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १५७ (केदार जाधव नाबाद ६३, क्विंटन डी कॉक ५०; कर्ण शर्मा २/१२)
सामनावीर : मोझेस हेन्रिक्स