ईडन गार्डन्सवर आयपीएलच्या आठव्या हंगामाची पराभवाने सुरुवात करणाऱ्या मुंबई इंडियन्सला वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावरील दुसऱ्या सामन्यातसुद्धा अपयश पदरी पडले. मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करल्यामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबने १८ धावांनी विजय मिळवत आपले खाते उघडले, परंतु संघ अडचणीत असताना हरभजन सिंगने जगदीशा सुचितला साथीला घेत तुफानी आतषबाजी करीत क्रिकेटरसिकांचे निखळ मनोरंजन केले.
पंजाबचा वेगवान गोलंदाज संदीप शर्माने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला भोपळाही फोडू दिला नाही. मग अनुरित सिंग चौथ्या षटकात आदित्य तरे (७) माघारी परतला.  मग मिचेल जॉन्सनने आरोन फिन्च (८) आणि अंबाती रायुडू (१३) यांना बाद केले, तर फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने कोरे अँडरसन (५) आणि किरॉन पोलार्ड (२०) यांना बाद करून मुंबईची ६ बाद ५९ अशी केविलवाणी अवस्था केली. त्यानंतर हरभजनने हिंमतीने किल्ला लढवला. हरभजनने सुचितच्या (नाबाद ३४) साथीने १०० धावांची भागीदारी रचली. या भागीदारीत हरभजनचे योगदान ६४ धावांचे होते. हरभजनने २४ चेंडूंत ५ चौकार आणि ६ षटकारांसह ही आपली खेळी साकारली.
त्याआधी, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून किंग्ज इलेव्हन पंजाबला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जॉर्ज बेलीच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर पंजाबने ५ बाद १७७ धावा उभारल्या. पंजाबला मुरली विजय आणि वीरेंद्र सेहवाग यांनी ६० धावांची दमदार सलामी करून दिली.  मोठा फटका खेळण्याच्या नादात सेहवागला (३६) हरभजन सिंगने सापळ्यात जेरबंद केले. किरॉन पोलार्डने लाँग ऑनला त्याचा सुरेख झेल टिपला. मग ग्लेन मॅक्सवेलने (६) निराशा केली. विजयचा (३५) अडसरसुद्धा हरभजननेच दूर केला. मग बेलीने सामन्याची सूत्रे  हाती घेतली आणि मिलर (२४) यांनी चौथ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. लसिथ मलिंगाने मिलर आणि रिशी धवनाला तंबूची वाट दाखवली. बेलीने ३२ चेंडूंत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या साह्याने नाबाद ६१ धावा केल्या.

बेलीचा दिमाखदार खेळ  
६१ धावा
३२ चेंडू
४ चौकार
३ षटकार

संक्षिप्त धावफलक
किंग्ज इलेव्हन मुंबई : २० षटकांत ५ बाद १७७ (मुरली विजय ३५, वीरेंद्र सेहवाग ३६, जॉर्ज बेली नाबाद ६१; हरभजन सिंग २/२०, लसिथ मलिंगा २/३४) विजयी विरुद्ध मुंबई इंडियन्स : ७ बाद १५९ धावा (हरभजन सिंग ६४, जगदीश सुचिथ ३४, मिचेल जॉन्सन २/२३, अक्षर पटेल २/३०).
सामनावीर : जॉर्ज बेली