वानखेडेवरच्या घरच्या मैदानावर झालेल्या पराभवाची सव्याज परतफेड मुंबई इंडियन्सने शनिवारी चेपॉकवर केली. चेन्नई सुपर किंग्जला त्यांच्याच मैदानावर सहा विकेट्सने पराभूत करण्याची किमया मुंबईने सांघिक कामगिरीच्या जोरावर साधली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि पवन नेगी यांच्या फटकेबाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने १५८ धावा फटकावल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना अटीतटीच्या लढतीत १९व्या षटकामध्ये मुंबईच्या फलंदाजांनी तब्बल २४ धावांची लयलूट केली. मग चार चेंडू शिल्लक असताना विजय साकारत मुंबईने सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे.
चेन्नईच्या १५९ धावांचा पाठलाग करताना मुंबईला ८४ धावांची सलामी मिळाली. पार्थिव पटेल (४५) आणि लेंडल सिमन्स (३८)यांनी चेन्नईची गोलंदाजी बोथट करण्याचा प्रयत्न केला. पण अश्विनने ११व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर पटेलला आणि चौथ्या चेंडूवर सिमन्सला बाद करत ही जोडी फोडली आणि मुंबईला दुहेरी धक्का दिला. त्यानंतर फलंदाजीला आलेला किरॉन पोलार्ड (१) धावचीत झाला. त्यामुळे फक्त दोन धावांमध्ये मुंबईने तीन फलंदाज गमावले. या एकामागून एक बसणाऱ्या धक्क्यांनंतर कर्णधार रोहित शर्मा (१८) आणि अंबाती रायुडू यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करत ५.१ षटकांमध्ये ३९ धावांची भागीदारी रचली. हे दोघे आता संघाला विजय मिळवून देतील असे वाटत असताना मोठा फटका मारण्याच्या नादात रोहितने आपली विकेट गमावली. अखेरच्या १२ चेंडूंमध्ये ३० धावांची गरज असताना पवन नेगीच्या १९व्या षटकामध्ये हार्दिक पंडय़ाने तीन तर अंबाती रायुडूने एक षटकार लगावला आणि मुंबईने तब्बल २४ धावा काढल्या. रायुडूने १९ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ३४ धावांची खेळी साकारली, तर पंडय़ाने फक्त ८ चेंडूंमध्ये तीन षटकारांसह नाबाद २१ धावा केल्या आणि विजयात मोलाचे योगदान दिले.
तत्पूर्वी, चेन्नईने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण त्यांची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. ठराविक फरकाने फलंदाज गमावल्यामुळे त्यांची १५.२ षटकांमध्ये ४ बाद १०४ अशी स्थिती झाली. पण त्यानंतर धोनी आणि नेगी यांनी २८ चेंडूंमध्ये ५४ धावांची भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. धोनीने यावेळी प्रत्येकी दोन चौकार आणि षटकारांच्या जोरावर नाबाद ३९ धावांची खेळी साकारली. धोनीपेक्षा नेगी अधिक आक्रमण करताना दिसला. नेगीने १७ चेंडूंमध्ये ४ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३६ धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
चेन्नई सुपर किंग्ज : २० षटकांत ५ बाद १५८ (महेंद्रसिंग धोनी ३९, पवन नेगी ३७; जगदीश सुचित १/२१) पराभूत वि. मुंबई इंडियन्स : १९.२ षटकांत ४ बाद १५९ (पार्थिव पटेल ४५, लेंडल सिमन्स ३८, अंबाती रायुडू नाबाद ३४; आर. अश्विन १/१७)
सामनावीर : हार्दिक पंडय़ा.