पृथ्वीवरील नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती आणि प्राण्यांची एक यादी केली जाते. तिला रेड डेटा बुक असे म्हणतात. त्या सजीव जातींचे रक्षण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला जातो. असेच क्रिकेटचे रेड डेटा बुक बनवले तर लेगस्पिनरची नोंद पहिली असेल. ही कला जोपासणारे फार थोडे खेळाडू आहेत. जिथे लेगस्पिनर गोलंदाजी करत असेल अशा सामन्यांना वारसा मूल्य असले पाहिजे आणि पालकांनी मुलाना आवर्जून नेऊन हे सामने दाखवायला हवे.
दिल्लीच्या संघाने अंतिम संघात दोन लेगस्पिनर खेळवले, या बद्दल दिल्लीचे अभिनंदन. मुख्य म्हणजे हे दोघे चांगले लेगस्पिनर आहेत. अमित मिश्राचा लेगस्पिन चांगला वळतो तर ताहिरचा गुगली चांगला वळतो. काल चेपॉकला दोघांनी मस्त गोलंदाजी केली. ताहिर विकेट काढल्यावर आनंदात इतका लांब पळत जातो की आपल्याला भीती वाटते की आता हा परत येतो की नाही! युवराजने मात्र निराशा केली
भारतीय खेळपट्या कात टाकतायत. काल सुद्धा बाउन्स आणि टर्न होता. टी-२० मध्ये १५० स्कोअर म्हणजे गोलंदाजाना चांगला न्याय होता, असं म्हणता येईल.
आयपीएलमुळे भारताला काही चांगले खेळाडू मिळाले, तसे काही खेळाडू गमावले. उदा. आशिष नेहरा दुखापतीने त्रस्त झाल्यावर त्याने ४ ओवर्स टाकायच्या आयपीएलचा सहारा घेतला आणि देशाकडून खेळायचे सोडले. कालची त्याची गोलंदाजी पाहून वाटले की वर्ल्डकपला तो असता तर मजा आली असती.
चेन्नईचा १५० स्कोअर गाठताना दिल्ली थोडक्यात कमी पडली. अश्विनने चेंडू मस्त फिरवले. ईश्वर पांडेकडे लक्ष ठेवायला हवे. केदार जाधव डेलिकेट टचच्या जरा जास्तच प्रेमात आहे. थर्डमॅन सोडून बाकी अख्खे मैदान असते फलंदाजाला.
मॅच मस्त झाली. पण दोन लेगस्पिनर एका वेळेस गोलंदाजी करतायत म्हणजे गुलाबजामवर मलईचा योग होता!
– रवि पत्की
sachoten@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)