07 July 2020

News Flash

BLOG: बिनीचा शिलेदार!

आजचा लेख लिहिताना मनात कृतज्ञता ओतप्रोत भरली आहे. कारण आज मला माझ्या भावना मांडायच्या आहेत, अशा एका खेळाडूबद्दल की ज्याने आपल्या क्रिकेटवेडय़ा भारतीयांना जल्लोषाचं, ताठ

| April 24, 2013 10:00 am

आजचा लेख लिहिताना मनात कृतज्ञता ओतप्रोत भरली आहे. कारण आज मला माझ्या भावना मांडायच्या आहेत, अशा एका खेळाडूबद्दल की ज्याने आपल्या क्रिकेटवेडय़ा भारतीयांना जल्लोषाचं, ताठ मानेनं जगण्याचं, अभिमानानं आणि आनंदानं ऊर भरून येण्याचं आणि एकूणच जगण्याचं कारण दिलं. तो खेळाडू म्हणजे रॉजर बिन्नी. १९८३ ते १९८५ हा भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ होता. या काळात आपल्या संघाने वर्ल्ड कप, एशिया कप, ऑस्ट्रेलियातील वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ क्रिकेट, शारजातील रॉथमन्स कप अशा चार स्पर्धा खिशात घातल्या. या वेगवेगळय़ा देशांतील स्पर्धा जिंकण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण होतं रॉजर बिन्नी आणि मदन लाल यांची दृष्ट लागण्यासारखी गोलंदाजी. त्यांनी या काळात कोणत्याच संघाला पन्नास ओव्हर्स खेळू दिल्या नाहीत. बिन्नी १९८३ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये येऊन चार वर्षे झाली होती. इंग्लंडच्या स्विंग होणाऱ्या वातावरणात त्याने विरोधी संघाची दाणादाण उडवली होती. बिन्नीच्या हवेत स्विंग होणाऱ्या चेंडूवर स्लिपमधले गेलेले कॅच, उडालेल्या दांडय़ा बघताना डोळय़ांवर विश्वास बसत नव्हता. जी नामुष्की रॉबर्ट्स होल्डिंग, गार्नर अ‍ॅल्डरमन, बोथम, विलीस आपल्या फलंदाजांवर लादत होते आणि तो अत्याचार हतबलपणे बघण्याची आपल्याला सवय झाली होती ती नामुष्की बिन्नीने इतर फलंदाजांवर लादलेली बघताना किती गुदगुल्या होत होत्या! डाव्या हाताचे फलंदाज तर बिन्नीचा कोणता बॉल आत येईल आणि कोणता बाहेर जाईल, याचा हिशेब लावता लावता शरण येत होते. बिन्नीच्या गि-हाइकांची यादी काढली तर वूड, यालाप, बॉर्डर, हूक्स, फौलर असे डावखरे कायमचे बकरे झालेले लक्षात येईल. स्विंग बॉलरने मीडियम पेसवर घेतलेल्या विकेट्सच्या आनंदाची तुलना ही शास्त्रीय संगीतातल्या झपतालातल्या किंवा त्रितालातल्या मध्य लयीतल्या बंदिशीच्या आनंदाशीच होऊ शकेल. कोणतीही घाई नाही, गडबड नाही, आक्रमण नाही, आक्रस्ताळेपणा नाही. फक्त लडिवाळ आवर्तनातून आलेली श्रुती धन्य करणारी, अहाहाचा अनुभव देणारी सम. बिन्नीने या दोन वर्षांत या सर्वोच्च उत्कट क्षणाचा मनमुराद आनंद दिला. बॅट आणि पॅडमधून गेलेला बॉल, मिडलकडून ऑफकडे जाणाऱ्या बॉलवर अनाहूतपणे लागलेली बॅटची कड आणि स्लिपमध्ये पकडलेल्या कॅचचे नयनरम्य दृश्य, याचा अनुभव बिन्नीने किती वेळा दिला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्या या कलात्मक अदाकारीने कायम भारतीय विजयाचं भरतवाक्य लिहिल गेलं.
आज बिन्नीचा मुलगा स्टुअर्ट बिन्नी आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतोय. छोटय़ा छोटय़ा, पण महत्त्वाच्या हातभारातून तो उपयोगिता सिद्ध करतोय. वडिलांसारखा सर्व इष्ट ग्रह अनुकूल होण्याच्या काळाच्या प्रतीक्षेत तो आहे. रॉजरप्रमाणे स्टुअर्ट पण ‘बिनीचा शिलेदार’ म्हणून उदयाला येवो!
sachoten@hotmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 24, 2013 10:00 am

Web Title: ipl blog on roger binny by ravi patki
टॅग Ipl
Next Stories
1 पंजाबचा सहज विजय!
2 हिम्मतवाला..
3 घरच्या मैदानावर कोलकाताची मुंबईविरुद्ध आज कसोटी
Just Now!
X