इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १३वा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी स्टेडियमच्या एकूण प्रेक्षक क्षमतेपैकी किमान ३० टक्के चाहत्यांना प्रवेश देण्यात येईल, अशी आशा होती. परंतु करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाऊन सामन्याचा आनंद लुटण्यासाठी अधिक प्रतीक्षा करावी लागणार आहे, असेच सध्या निदर्शनास येते.

करोना साथीच्या पाश्र्वभूमीवर यंदा प्रथमच सप्टेंबर-नोव्हेंबरदरम्यान अमिरातीत ‘आयपीएल’ खेळवण्यात येणार आहे. अबू धाबी, शारजा आणि दुबई येथे ‘आयपीएल’चे सामने खेळवण्यात येणार असून अमिराती क्रिकेट मंडळाचे सरचिटणीस मुबाशिर उस्मानी यांनी स्टेडियमच्या प्रेक्षकक्षमतेपैकी किमान ३० टक्के चाहत्यांना प्रवेश देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे मत गेल्या महिन्यात व्यक्त केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ते शक्य नसल्याचे समजते.

‘‘अमिराती क्रिकेट मंडळाचे पदाधिकारी सातत्याने अबू धाबी, शारजा आणि दुबई येथील क्रीडा परिषद तसेच आरोग्य आणि प्रतिबंध मंत्रालयाशी संवाद साधत आहे. येथील चाहत्यांना स्टेडियममधून ‘आयपीएल’चे सामने पाहता यावेत, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु तूर्तास तरी प्रेक्षकांशिवायच ‘आयपीएल’चे सामने खेळवावे लागतील, अशी शक्यता आहे,’’ असे उस्मानी एका स्थानिक संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.

लाचलुचपतविरोधी विभागाद्वारे ‘बीसीसीआय’चे लक्ष

नवी दिल्ली : ‘आयपीएल’मध्ये लाचलुचपत किंवा सामनानिश्चितीसारखी कृत्ये घडू नयेत म्हणून इंग्लंडस्थित ‘स्पोर्ट्सरडार’ कंपनीशी करार करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ लाचलुचपतविरोधी विभागाद्वारे (एसीयू) ‘आयपीएल’मधील संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. ‘‘बीसीसीआयकडून यंदा स्पोर्ट्सरडार कंपनीशी आयपीएलकरता करार करण्यात आला आहे. ते एसीयूसोबत काम करतील. गोवा फुटबॉल लीगमध्ये नुकत्याच १२ लढती सामना निश्चितीच्या कचाटय़ात असल्याचे स्पोर्ट्सरडारने शोधून काढले होते. जगभरातील लीगमधील सामनानिश्चितीच्या प्रकरणांचा शोध स्पोर्ट्सरडारमार्फत घेण्यात येतो,’’ असे लाचलुचपतविरोधी विभागाचे प्रमुख अजित सिंग म्हणाले.

ऋतुराज पहिल्या लढतीला मुकणार

चेन्नई सुपर किंग्जचा ऋतुराज गायकवाड ‘आयपीएल’च्या सलामीच्या लढतीसाठी उपलब्ध नसेल. ऋतुराजच्या दुसऱ्या करोना चाचणीचा अहवालही सकारात्मक आल्याने त्याला आणखी सहा दिवस विलगीकरण करावे लागणार आहे.