आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा फॉम्र्युला जागतिक स्तरावर अतिशय लोकप्रिय झाला. या स्पर्धेत दरवर्षी विविध देशांचे अनेक अनुभवी व नवोदित खेळाडू चमकतात. ही स्पर्धा आपल्या देशातील खेळाडूंसाठी भारतीय संघात प्रवेश मिळविण्यासाठी असलेली हुकमी संधी मानली जाते. भारतीय संघात प्रवेश करू इच्छिणारे नवोदित खेळाडू व संघातून वगळण्यात आलेले खेळाडू सर्वासाठी ही स्पर्धा निवड समितीचे दार ठोठावण्याकरिता प्रवेशद्वार मानली जाते.
आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून भारतीय क्रिकेटपटूंना सतत कार्यरत रहावे लागत आहे. वर्षांतील १५-२० दिवसांचा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंना सतत विविध सामन्यांमध्ये खेळावे लागत असते आणि तेही ट्वेन्टी-२०, एकदिवसीय व कसोटी अशा विविध स्वरूपाच्या सामन्यांमध्ये भाग घ्यावा लागत असल्यामुळे खेळाडूंवर ताण पडत असतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या कामगिरीवर दिसून येतो. साहजिकच खेळाडूंना आलटून पालटून विश्रांती देण्याची आवश्यकता असते. त्यामुळेच आता भारताकरिता मुख्य संघ आणि पर्यायी संघ अशा दोन्ही संघांमधील खेळाडू निवडण्याकरिता निवड समितीला विचार करावा लागतो. संघातील प्रत्येक स्थानाकरिता आता खूपच चढाओढ दिसून येऊ लागली आहे. संघातील आपले स्थान ध्रुवताऱ्यासारखे अढळ आहे असे कोणी समजू लागले तर त्याचा भ्रमनिरास होऊ शकतो.
भारताच्या संघात स्थान मिळविणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी युवा खेळाडूंकरिता आयपीएल स्पर्धा अतिशय उपयुक्त मानली जाते. यंदा भारतीय संघाच्या उंबरठय़ावर असलेले ईश्वर पांडे, अभिषेक झुनझुनवाला, अनिरुद्ध श्रीकांत, स्टुअर्ट बिन्नी, प्रदीप संगवान, विजय झोल, धीरज जाधव, सुदीप त्यागी, उन्मुक्त चंद, अभिषेक नायर आदी युवा खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष राहणार आहे. उन्मुक्त चंदने १९ वर्षांखालील गटाच्या विश्वचषक स्पर्धेत भारताला विजेतेपद मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. भारतीय संघाचे नेतृत्व करताना त्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. त्याच्याकडे आतापासूनच पुरस्कर्त्यांचा ओघ सुरू झाला आहे. अनिरुद्ध श्रीकांत हा भारताचे माजी सलामीवीर व निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांचा मुलगा आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणारा अनिरुद्ध हा वडिलांप्रमाणेच तडाखेबाज फलंदाज म्हणून ख्यातनाम आहे. स्टुअर्ट बिन्नी हा भारताचे ज्येष्ठ अष्टपैलू क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणेच तोही अष्टपैलू खेळाडू आहे.
महाराष्ट्राचा सलामीवीर विजय झोल याने स्थानिक स्तरावरील कनिष्ठ गटाच्या स्पर्धामध्ये फलंदाजीत अनेक विक्रम केले आहेत. तसेच त्याने रणजी सामन्यांमध्ये चमक दाखविली आहे. त्याचा सहकारी धीरज जाधव हा उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहे. त्याने गेल्या चार वर्षांमध्ये स्थानिक स्पर्धामध्ये आपल्या अष्टपैलूत्वचा ठसा उमटविला आहे. ईश्वर पांडे हा अतिशय गुणवान फिरकी गोलंदाज आहे. यंदाच्या स्थानिक सामन्यांमध्ये त्याने साडेतीनशेपेक्षा जास्त षटके गोलंदाजी केली आहे.
पंकज सिंग, सुदीप त्यागी, जयदेव उनाडकट यांच्याकडून आयपीएलमध्ये चांगल्या यशाची अपेक्षा मानली जात आहे. सचिन बेबी हा सचिन तेंडुलकरचा वारसदार मानला जात असून केरळच्या या २४ वर्षीय खेळाडूने तडाखेबाज फलंदाज म्हणून नावलौकिक मिळविला आहे. भारतीय संघात आत-बाहेर करणाऱ्या खेळाडूंना आपले स्थान पुन्हा मिळविण्यासाठी आयपीएल स्पर्धा सुवर्णसंधी असते. एस. श्रीशांत, युसूफ व इरफान हे पठाण बंधू, परविंदर अवाना, अजिंक्य रहाणे, पार्थिव पटेल, वृद्धिमान साहा, पीयुष चावला, सुरेश रैना, रॉबिन उथप्पा आदी खेळाडू भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी धडपडत आहेत. दुखापतीमधून तंदुरुस्त झाल्यानंतर संघात पुनरागमनासाठी इच्छुक असलेले झहीर खान, उमेश यादव यांना आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी आयपीएलचे सामने उपयुक्त ठरणार आहेत. भारतीय संघातून डच्चू देण्यात आलेल्या गौतम गंभीर व वीरेंद्र सेहवाग यांना आपण अजूनही अव्वल दर्जाची फलंदाजी करू शकतो हे सिद्ध करण्यासाठी ही आयपीएल स्पर्धा अखेरची संधीच आहे.
आयपीएल स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला या स्पर्धेद्वारे बक्कळ कमाई करता येते. युवा खेळाडूंकरिता ही स्पर्धा भविष्यातील आपली कारकीर्द समर्थ करण्यासाठी सोनेरी संधी मानली जात आहे. यंदाही भारताची युवा ब्रिगेड आयपीएल स्पर्धेत आपल्या कामगिरीचा ठसा उमटवतील अशी खात्री आहे.