अमिर खानच्या लगान चित्रपटातील क्रिकेट सामन्याचा शेवट ज्या प्रकारे झाला तो क्षण खऱ्या क्रिकेट सामन्यात पहायला मिळणे म्हणजे निव्वळ योगायोग म्हणायला हवा. तो योगायोग शुक्रवारी बँगलोरचा आणि हैदराबाद यांच्यातील सामन्यात आला. विराट कोहलीने मारलेल्या उत्तुंग फटक्याचा झेल घेऊन क्षेत्ररक्षक वॉर्नर सरळ सीमा रेषेवरच उभा ठाकला. हृदयाचे ठोके चुकविणारा हा क्षण पंचांना देखील बुचकळ्यात टाकणारा ठरला. आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेतील पावसामुळे खोळंबलेल्या रॉयल चॅलेंर्जस बँगलोर आणि सनरायर्जस हैदराबाद यांच्यातील साखळी सामन्यात शुक्रवारी कोहली आणि गेल यांच्या तूफानी खेळीने रंगतभरली. कोहली आणि गेल यांच्या खेळाच्या जोरावर रॉयल चॅलेंर्जस बँगलोरने सनरायर्जस हैदराबाद ला शुक्रवारी धोबीपछाड दिली. या विजया बरोबरच रॉयल चॅलेंर्जस बँगलोरची आयपीएल आठच्या प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रॉयल चॅलेंर्जस बँगलोरचा या मोसमातील हा सातवा विजय आहे.  
आरसीबीने ५.५ षटकांमध्ये चार विकेटच्या बदल्यात ८३ धावा घेत विजय नोंदवला. पावसामुळे आरसीबीला ६ षटकांमध्ये ८१ धावांचे लक्ष्य देण्यात आले होते. विराट कोहलीने १९ चेंडूमध्ये नाबाद ४४ धावा केल्या.