कोलकाता नाइट रायडर्सचा संघ २०१२चे आयपीएल जेतेपद जिंकेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण चेपॉकवर चेन्नईकरांच्या साक्षीने चेन्नई सुपर किंग्जसारख्या बलाढय़ संघाला हरवत कोलकाता नाइट रायडर्सने प्रथमच आयपीएल विजेतेपदाचा मान मिळवला. आयपीएलमध्ये सर्वाधिक वादविवादात असणारा हा संघ गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली मागील हंगामात मैदानावरही बहरला. आयपीएल ५४ दिवसांच्या प्रवासाचा श्रीगणेशा बुधवारी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. कोलकाता संघ आयपीएल जेतेपद राखण्यासाठी आपल्या अभियानाचा झोकात प्रारंभ करण्यास उत्सुक आहे.
आयपीएल आजवरच्या इतिहासात फक्त चेन्नई सुपर किंग्जच्या खात्यावर दोन सलग अजिंक्यपदे जमा आहेत. हाच कित्ता गिरविण्याचा निर्धार कोलकाता संघाने केला आहे. त्यांच्यासमोर उभा ठाकलेला दिल्लीचा संघ अद्याप एकदाही विजेता ठरू शकलेला नाही. यंदा गुडघ्याच्या दुखापतीमुळे इंग्लंडचा शैलीदार फलंदाज केव्हिन पीटरसन संपूर्ण आयपीएल मोसमात खेळू शकणार नाही. त्यामुळे दिल्लीकरांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दिल्लीला किवी फलंदाज जेसी रायडरचीही उणीव भासेल. या वर्षी झालेल्या लिलावामध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सने रायडरला तीन लाख अमेरिकन डॉलर्सला खरेदी केले होते. परंतु ख्राइस्टचर्च येथे रायडरवर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यातून तो सावरत आहे.
मागील हंगामातील ‘पर्पल कॅप’ विजेता मॉर्नी मॉर्केल हासुद्धा पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. याचप्रमाणे धावांसाठी झगडणारा सलामीवीर वीरेंद्र सेहवागसुद्धा पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, त्याच्या खेळण्याची शक्यताही कमीच दिसत आहे.
दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार गौतम गंभीर काविळीच्या आजारातून सावरला आहे. घरच्या मैदानावर संघाला विजयी प्रारंभ करून देण्यासाठी तो उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत संघाबाहेर राहण्याची नामुष्की पत्करणाऱ्या गंभीरला पुन्हा भारतीय संघातील आपले स्थान प्राप्त करण्याची उत्सुकता आहे. किवी फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम अजून दुखापतीतून बरा झालेला नाही. शाकिब अल हसन नुकताच विवाहबद्ध झाला आहे.
कोलकाताच्या गतवर्षीच्या यशात वेस्ट इंडिजचा जादुई फिरकी गोलंदाज सुनील नरिनचा (२४ बळी) सिंहाचा वाटा होता. या हंगामात श्रीलंकेचा ऑफ-स्पिनर सचित्र सेनानायके आणि डावखुरा फिरकी गोलंदाज इक्बाल अब्दुल्ला त्यांच्या दिमतीला आहे. जॅक कॅलिसचा अनुभव संघाला तारणारा ठरेल, तसेच लक्ष्मी रतन शुक्ला, मनोज तिवारी, मानविंदर बिस्ला आणि देवब्रत दास हे युवा खेळाडू घरच्या मैदानावर चमत्कार दाखवू शकतील.
कोलकात्याकडे यंदा संतुलित वेगवान-फिरकी मारा आहे. यंदा वसिम अक्रमच्या अनुपस्थितीत गोलंदाजांच्या मार्गदर्शनाची भूमिकाही बजावणाऱ्या ब्रेट लीसोबत ऑस्ट्रेलियाचाच जेम्स पॅटिन्सन वेगवान माऱ्याची धुरा वाहेल. मागील हंगामात एल. बालाजी कोलकातासाठी सर्वात किफायतशीर ठरला होता.
दिग्गज ख्ेाळाडूंच्या अनुपस्थितीत दिल्लीला धावांसाठी झगडणारे डेव्हिड वॉर्नर आणि वीरेंद्र सेहवाग तारणार का, हे बुधवारी स्पष्ट होईल. कर्णधार महेला जयवर्धनेसुद्धा दुखापतीतून सावरला आहे. १९-वर्षांखालील विश्वविजेत्या भारतीय संघाचा कप्तान उन्मुक्त चंद त्यांच्याकडे आहे. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेत चंदने दोन सलग शतके ठोकली होती.
संघ – कोलकाता नाइट रायडर्स : गौतम गंभीर (कर्णधार), ब्रॅड हॅडिन, ब्रेट ली, देवब्रत दास, ईऑन मॉर्गन, इक्बाल अब्दुल्ला, जॅक कॅलिस, जेम्स पॅटिन्सन, लक्ष्मीपती बालाजी, लक्ष्मी रतन शुक्ला, मनोज तिवारी, मानविंदर बिस्ला, शामी अहमद, प्रदीप सांगवान, रजत भाटिया, रयान मॅकलारेन, रयान टेन डोइश्चॅट, सचित्र सेनानायके, सरबजित लड्डा, सुनील नरिन आणि युसूफ पठाण.
दिल्ली डेअरडेव्हिल्स : महेला जयवर्धने (कर्णधार), अजित आगरकर, आंद्रे रसेल, अरिष्ट सिंघवी, आशिष नेहरा, सी. एम. गौतम, डेव्हिड वॉर्नर, गुलाम बोदी, इरफान पठाण, जीवन मेंडिस, जोहान बोथा, केदार जाधव, मनप्रीत जुनेजा, नमन ओझा, पवन नेगी, रॉल्फ व्हान-डर मर्वे, रॉयस्टन डायस, सिद्धार्थ कौल, सुजित नायक, शाहबाझ नदीम, उमेश यादव, उन्मुक्त चंद, वेणुगोपाळ राव, वीरेंद्र सेहवाग आणि योगेश नगर.
सामन्याची वेळ : रात्रौ ८ वा.पासून
ब्रेट ली, कोलकाता नाइट रायडर्सचा गोलंदाज
कोलकाताच्या खेळाडूंबरोबर एक चांगले सराव सत्र पार पडले. पहिल्या सामन्यासाठी आम्ही सारे सज्ज झालो आहोत. कर्णधार गौतम गंभीर संघात दाखल झाल्याने आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे!