संघात गुणवान खेळाडू असूनही असातत्याचा शाप लागलेल्या पुणे वॉरियर्ससमोर किंग्स इलेव्हन पंजाबचे आव्हान असणार आहे. गुणतालिकेत तळाच्या संघांमध्ये होणारी ही सन्मानाची लढाई असणार आहे.
हैदराबाद सनरायजर्सविरुद्ध नाहक चुकांमुळे पराभव झालेल्या पुण्याला फलंदाजीत आमूलाग्र सुधारणा करावी लागले. रॉबिन उथप्पा, एरॉन फिन्च, स्टीव्हन स्मिथ यांच्यासह युवराज सिंगला प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल. कर्णधार अँजेलो मॅथ्यूजला संघातले स्थान टिकवण्यासाठी दमदार प्रदर्शन करावे लागणार आहे. भुवनेश्वर कुमार, राहुल शर्मा, ही जोडगोळी चांगले प्रदर्शन करत आहे. या दोघांना अन्य गोलंदाजांकडून चांगल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे पंजाबलाही फलंदाजी मजबूत करावी लागेल. अनुभवी अ‍ॅडम गिलख्रिस्ट, डेव्हिड हसी, नवोदित मनन व्होरा, मनदीप सिंग यांच्यापैकी एकाला तरी मोठी खेळी करणे आवश्यक आहे. पुण्याविरुद्धच्या सामन्यात हसीच्या जागी शॉन मार्शला संधी मिळण्याची शक्यता आहे. अझर मेहमूद आणि मनप्रीत गोणीचा अष्टपैलू खेळ पंजाबसाठी जमेची बाजू ठरू शकतो. प्रवीण कुमार, परविंदर अवाना तसेच पीयूष चावला यांच्याकडून नियमितपणे चांगली कामगिरी होणे पंजाबसाठी आवश्यक झाले आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता