लागोपाठ दोन पराभव स्वीकारणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबला आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या लढतीत कसोटीस सामोरे जावे लागणार आहे. घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा ते कसे घेतात हीच उत्सुकता या लढतीबाबत निर्माण झाली आहे.
कोलकाता संघ बलाढय़ मानला जात असून त्यांनी रविवारी घरच्या मैदानावर सनराइज हैदराबाद संघास ४८ धावांनी पराभूत केले होते. किंग्ज संघाने पुणे वॉरियर्सला पराभूत करीत या स्पर्धेत विजयी प्रारंभ केला होता मात्र त्यानंतर त्यांना चेन्नई सुपरकिंग्ज व राजस्थान रॉयल्स यांच्याविरुद्धचे सामने गमवावे लागले होते. विशेषत: राजस्थानने त्यांच्यावर सहा गडी राखून विजय मिळविताना अनपेक्षित धक्का दिला आहे.
यष्टिरक्षक अ‍ॅडम गिलख्रिस्ट याच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या किंग्ज संघास पूर्णपणे २० षटके खेळून काढण्यात अपयश आले आहे, ही त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. चेन्नईविरुद्ध त्यांचा डाव २० व्या षटकांत संपुष्टात आला होता तर राजस्थानविरुद्ध त्यांचा डाव १९ व्या षटकांत आटोपला होता. कोलकाताविरुद्धच्या लढतीत वर्चस्व मिळविण्यासाठी किंग्ज संघाच्या गिलख्रिस्ट, डेव्हिड हसी, मनदीपसिंग, गुरकिरतसिंग व आर.सतीश यांना आपल्या क्षमतेइतकी शैलीदार फलंदाजी करणे आवश्यक आहे. डेव्हिड हसी याने या स्पर्धेत सातत्य दाखविले आहे. हेच सातत्य त्याच्याकडून पुढेही अपेक्षित आहे. त्यांच्या गोलंदाजीची मदार प्रवीणकुमार, रियान हॅरीस, अजहर मेहमूद, परविंदर अवाना व पीयूष चावला यांच्यावर आहे.
या तुलनेत कोलकाता संघाची बाजू वरचढ मानली जात आहे. या सामन्यात विजय मिळविणे त्यांच्यासाठी आवश्यक आहे. फलंदाजीत त्यांची भिस्त गौतम गंभीर, इओन मोर्गन, जॅक्वीस कॅलीस यांच्यावर आहे. गोलंदाजीत  ब्रेट ली, लक्ष्मीपती बालाजी, कॅलीस, फिरकीचा जादूगार सुनील नरेन यांच्याकडून त्यांना अव्वल यशाची कामगिरी अपेक्षित आहे. येथील खेळपट्टी द्रुतगती गोलंदाजांना अनुकूल मानली जात आहे.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.पासून.