नेत्रदीपक क्षेत्ररक्षण केले तर विजय आपोआपच मिळतो, याचाच प्रत्यय घडवत राजस्थान रॉयल्स संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबला २६ धावांनी हरवले आणि आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत विजयाची बोहनी केली. त्यांच्या या विजयात जेम्स फॉकनरने केलेल्या अष्टपैलू कामगिरीचा मोठा वाटा होता. विजयासाठी १६३ धावांच्या आव्हानाला सामोरे जाताना किंग्ज संघाने २० षटकांत ८ बाद १३६ धावा केल्या.
फॉकनरने केलेल्या तडाखेबाज ४६ धावांमुळेच राजस्थान रॉयल्सला निर्धारित २० षटकांत ७ बाद १६२ धावांपर्यंत पोहोचता आले. प्रभारी कर्णधार स्टीव्हन स्मिथ (२३ चेंडूंत ३३) व दीपक हुडा (१५ चेंडूंत ३०) यांचीही संघाला बहुमोल साथ लाभली. किंग्ज इलेव्हनला १६२ धावांचे आव्हान किंग्ज इलेव्हनला पेलवले नाही. राजस्थानच्या गोलंदाजांची कल्पक गोलंदाजी व क्षेत्ररक्षकांनी त्यांना दिलेली योग्य साथ यामुळेच त्यांना सहज विजय मिळविता आला. फॉकनरने तीन महत्त्वपूर्ण बळी घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला.
क्रिकेटमध्ये चार पावसाळे जास्त पाहिलेल्या वीरेंद्र सेहवागची यष्टीबाहेर जाणाऱ्या चेंडूवर बाद होण्याची सवय अजूनही गेलेली नाही. गहुंजेवरील पहिल्याच चेंडूवर तो शून्यावर तंबूत परतला. त्यामुळे त्याचा खेळ पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची सपशेल निराशा झाली. पाठोपाठ वृद्धिमान साहा (७) धावांवर धावबाद झाल्यामुळे किंग्जचा डाव २ बाद ३२ असा अडचणीत आला. धडाकेबाज खेळाबाबत ख्याती असलेला ग्लेन मॅक्सवेलनेही (७) निराशा केली. एका बाजूने आत्मविश्वासाने खेळणाऱ्या मुरली विजयने ३२ चेंडूंत ३७ धावा केल्या. त्यामध्ये त्याने एक षटकाराबरोबरच चार चौकारही मारले. तो बाद झाल्यानंतर मधल्या फळीत अक्षर पटेल व डेव्हिड मिलर यांनी संघास विजयासाठी पायाभरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र ही जोडी मोठी भागीदारी करणार असे वाटत असतानाच मिलर बाद झाला. त्याने तीन चौकार व एक षटकारासह २३ धावा केल्या. निम्मा संघ ९२ धावांमध्ये परतल्यामुळे किंग्ज संघावरील दडपण वाढत गेले. त्यामुळे त्यांच्या फटकेबाजीवरही नियंत्रण आले. शेवटच्या सहा षटकांत त्यांना ६२ धावांची गरज होती. एका बाजूने चिवट फलंदाजी करणाऱ्या अक्षरचा त्रिफळा उडवत टीम साऊथीने किंग्जच्या अडचणीत आणखी भर टाकली. अक्षरने दोन चौकारांसह २४ धावा केल्या. कर्णधार जॉर्ज बेलीनेही २४ धावांची भर घातली तरीही
त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही.

संक्षिप्त धावफलक
राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ७ बाद १६२ (जेम्स फॉकनर ४६, स्टिव्हन स्मिथ ३३; अनुरीत सिंग ३/२३, मिचेल जॉन्सन २/३४) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकांत ८ बाद १३६ (मुरली विजय ३७, डेव्हिड मिलर २३; टीम साऊदी २/३६, जेम्स फॉकनर ३/२६)
सामनावीर : जेम्स फॉकनर