मुंबईवर इंडियन्सवर ५० धावांनी मात
अझहर मेहमूदच्या शानदार अष्टपैलू खेळाच्या जोरावर किंग्ज ईलेव्हन पंजाबने यंदाच्या मोसमाची विजयी सांगत केली. शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केल्याने पंजाबचे बाद फेरीचे स्वप्न संपुष्टात आले होते. मात्र शेवटच्या लढतीत बलाढय़ मुंबई इंडियन्सवर मात करत पंजाबने कर्णधार अॅडम गिलख्रिस्टला विजयी निरोप दिला.
प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत ८ बाद १८३ धावा केल्या. अझहरने ४४ चेंडूंत आठ चौकार व चार षटकारांसह ८० धावा केल्या. त्याला मार्शने दमदार साथ देताना ४७ चेंडूंत ६३ धावा केल्या. त्यामध्ये त्याने ११ चौकार मारले. मनन व्होरा याने तीन चौकार व एका षटकारासह नाबाद २० धावा केल्या. त्यानंतर मुंबईचा डाव १९.१ षटकांत १३३ धावांमध्ये आटोपला. मुंबईकडून आदित्य तरे (२२), अंबाती रायुडू (२६), कर्णधार रोहित शर्मा (२५), किरॉन पोलार्ड (२२) यांचे प्रयत्न अपुरे ठरले. गिलख्रिस्टने गोलंदाजीचा आनंद घेण्यासाठी अखेरच्या षटकात गोलंदाजीसाठी चेंडू हाती घेतला आणि पहिल्याच चेंडूवर हरभजन सिंगचा बळीही मिळवला.
मुंबई इंडियन्सने २२ गुणांसह यापूर्वीच बाद फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. किंग्ज ईलेवहन पंजाबचे १६ गुण झाले आहेत. मेहमूद सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.