07 July 2020

News Flash

चिन्नास्वामी प्रसन्न होऊ दे!

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी गाठ पडत आहे.

| May 2, 2015 03:22 am

चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध रोमहर्षक विजय मिळवणाऱ्या गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाची शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाशी गाठ पडत आहे. या पाश्र्वभूमीवर आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी कोलकाता उत्सुक आहे. तर घरच्या मैदानावरील पराभवाची मालिका खंडित करण्याचा निर्धार बंगळुरूने केला आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या खात्यावर ८ सामन्यांपैकी ४ विजय आणि ३ पराभव जमा आहेत. ते ९ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ७ सामन्यांपैकी ३ जिंकले आहेत, तर ३ गमावले आहेत. हा संघ ७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
गुरुवारी कोलकाताने चेन्नईविरुद्ध अखेरच्या षटकात रंगतदार विजय संपादन केला. रॉबिन उथप्पा (नाबाद ८०) आणि आंद्रे रसेल (नाबाद ५५) यांनी साकारलेल्या खेळीचे कप्तान गौतम गंभीरने कौतुक केले आहे. मात्र गंभीर आणि युसूफ पठाणच्या फलंदाजीत सातत्याचा अभाव जाणवत आहे. गोलंदाजीतही सातत्याचीच चिंता प्रकर्षांने जाणवत आहे. ऑस्ट्रेलियाचा ‘चायनामन’ गोलंदाज ब्रॅड हॉगने चेन्नईविरुद्ध महत्त्वाचे बळी मिळवले होते.
प्रतिस्पर्धी बंगळुरूला मात्र कमी लेखून चालणार नाही. कारण राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली आणि स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अपयशी ठरल्यावरसुद्धा बंगळुरूने २०० धावा उभारल्या होत्या. बंगळुरूने अहमदाबादला राजस्थानला तर फिरोझशाह कोटला स्टेडियमवर दिल्ली डेअरडेव्हिल्सला हरवून आपल्या विजयी आवेशाची ग्वाही दिली आहे. परंतु घरच्या मैदानावरील असमाधानकारक कामगिरी त्यांच्या चिंतेत भर घालणारी ठरू शकेल. बंगळुरूने एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सनरायजर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या तिन्ही संघांविरुद्ध हार पत्करली आहे. गेल, कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स यांच्यासारखे खेळाडू त्यांच्याकडे आहेत. कोहलीने मागील तीन सामन्यांपैकी दोन अर्धशतके झळकावून आशा निर्माण केली आहे.
बंगळुरूचा गोलंदाजीचा मारा अपेक्षित प्रभाव पाडू शकलेला नाही. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसह वरुण आरोन आणि डेव्हिड विसी यांचा समावेश आहे. याशिवाय फिरकीची मदार युझवेंद्र चहलवर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2015 3:22 am

Web Title: kkr vs rcb
टॅग Ipl
Next Stories
1 घरच्या मैदानावर हैदराबादला विजयाची आशा
2 जितबो रे!
3 वानखेडेवर मुंबई वि. मुंबईकर
Just Now!
X