फिरोझशाह कोटलाचे मैदान म्हणजे दिल्लीकर गौतम गंभीरचा बालेकिल्ला. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या गंभीरने जुन्या बालेकिल्ल्यात संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीला १४६ धावांत रोखत कोलकाताने अर्धी मोहिम जिंकली. गंभीरच्या अर्धशतकाच्या जोरावर कोलकाताने हे लक्ष्य ६ विकेट्स राखून गाठले. १८ धावांमध्ये २ बळी मिळवणारा कोलकाताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला यावेळी सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
माफक लक्ष्याचा पाठलाग करताना रॉबिन उथप्पा आणि मनीष पांडे झटपट परतले. सूर्यकुमार यादवने २४ धावांची खेळी केली. गंभीरने ४९ चेंडूत ८ चौकारांसह ६० धावांची खेळी साकारत संघाचा विजय सुकर केला. युसुफ पठाणने ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४० धावा करत गंभीरला चांगली साथ दिली.
तत्पूर्वी दिल्लीने अडखळत सुरुवातीनंतर १४६ धावांची मजल मारली. मयांक अगरवाल केवळ एक धाव करून तंबूत परतला, तर भरवशाचा जेपी डय़ुमिनी (५) नरिनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. श्रेयस अय्यर (३१) आणि मनोज तिवारी (३२) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली. स्थिरावलेल्या श्रेयसला पीयूष चावलाने बाद केले. मोठी खेळी करण्यासाठी पायाभरणी केलेल्या मनोज तिवारीला मॉर्केलने माघारी धाडले. युवराज सिंग (२१) तर अँजेलो मॅथ्यूज (२८) हे दोघेही झटपट तंबूत परतले. या दोघांच्या वेगवान खेळींमुळेच दिल्लीला सव्वाशेचा टप्पा ओलांडता आला. कोलकातातर्फे उमेश यादव, मॉर्ने मॉर्केल आणि पीयूष चावला यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ८ बाद १४६ (मनोज तिवारी ३२, श्रेयस अय्यर ३१, अँजेलो मॅथ्यूज २८, उमेश यादव २/१८, पीयूष चावला २/२७) पराभूत विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : १८.१ षटकांत ४ बाद १४७ (गौतम गंभीर ६०, युसुफ पठाण ४०, इम्रान ताहीर १/३०, नॅथन कोल्टिअर नील १/३०).
सामनावीर : उमेश यादव.