कोलकाता नाइट रायडर्सचा आज सामना किंग्ज इलेव्हन पंजाबशी
कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल विजेतेपद राखणे कठीण जाणार आहे. पण नशीब पालटेल आणि आपला संघ पुन्हा मुसंडी मारेल अशी आशा त्यांना वाटते आहे. दुसरीकडे किंग्ज इलेव्हन पंजाबसुद्धा नव्या ऊर्जेने घोडदौड करीत आहे. त्यामुळे पंजाबला हरवून स्पध्रेतील आपले आव्हान टिकविण्याचा कोलकाता कसोशीने प्रयत्न करील.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाइट रायडर्सने मागील हंगामात रुबाबात आयपीएल जेतेपदाला गवसणी घातली होती. पण चालू हंगामात सातपैकी पाच सामन्यांत त्यांच्या वाटय़ाला पराभव आले आहेत. त्यामुळे फक्त चार गुणांसह कोलकाताचा संघ आयपीएल गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यामुळे प्ले-ऑफचे स्वप्न साकारण्यासाठी कोलकाताला उर्वरित नऊ सामन्यांपैकी किमान सात सामने जिंकणे आवश्यक आहेत. यापैकी त्यांना पाच सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मदानांवर खेळायचे आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सची शुक्रवारी आयपीएलमधील दुबळा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंजाबशी गाठ पडणार आहे. परंतु लागोपाठ दोन विजय मिळविणाऱ्या पंजाबपासून त्यांनी सावधगिरी बाळगायला हवी. जॅक कॅलिस, मनोज तिवारी आणि लक्ष्मी रतन शुक्ला हे तिघे जण दुखापतीमुळे शुक्रवारच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे न्यूझीलंडचा धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्क्युलम, रयान टेन डोइश्चॅट, मनविंदर बिस्ला आणि मोहम्मद शामी अहमद यांना संघात स्थान मिळवता येऊ शकते.
मोहालीत किंग्ज इलेव्हन पंजाबने कोलकाला हरविण्याची किमया साधली होती. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी कोलकाताचा संघ उत्सुक आहे. दोन मध्यमगती गोलंदाज आणि एक जादुई फिरकी गोलंदाज यांच्यासह प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर आक्रमण करण्याची फलंदाजांची क्लृप्ती गेल्या हंगामात कोलकातासाठी यशस्वी ठरली होती.
सुनील नरिन प्रत्येक संघासाठी धोकादायक ठरत नाही. कारण आता या ऑफ-स्पिनर गोलंदाजाची चार षटके खेळण्याचे तंत्र विविध संघांनी चांगले आत्मसात केले आहे. बुधवारी रात्री ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर मुंबई इंडियन्सने कोलकातावर रोमहर्षक विजयाची नोंद केली. या सामन्यात नरिनच्या गोलंदाजीचे ४-०-१७-३ असे प्रभावी पृथक्करण होते. पण ड्वेन स्मिथ आणि किरॉन पोलार्ड यांनी कोलकाताच्या अन्य गोलंदाजांवर जोरदार हल्ले चढवत पाच विकेट राखून दमदार विजयाची नोंद केली.
फलंदाजांचे अपयश ही कोलकाता नाइट रायडर्सची सर्वात महत्त्वाची चिंतेची बाब आहे. धावांसाठी झगडणाऱ्या युसूफ पठाणने बुधवारी सलामीला उतरून ६ चेंडूंत १९ धावा केल्या. रजत भाटिया, सचित्र सेनानायके आणि इक्बाल अब्दुल्ला अपयशी ठरले. त्यामुळे आगामी सामन्यात कोलकाता संघाला डोइश्चॅटला खेळवावे लागणार आहे. दमदार फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी ही त्याची खासियत आहे.
मागील सामन्यात पंजाबने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध पाच विकेट राखून आरामात विजय नोंदवला होता. त्यामुळे पंजाबने शुक्रवारी कोलकाताला हरविल्यास कोणालाही आश्चर्य वाटणार नाही. मध्यमगती गोलंदाज हरमीत सिंग पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने २४ धावांत ३ बळी घेतले.
युवा मनदीप सिंग, अनुभवी डेव्हिड हसी आणि डेव्हिड मिलर यांनी फलंदाजीमध्ये पंजाबच्या संघाला चांगले स्थैर्य दिले आहे. परंतु कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट अद्याप आपल्या दर्जाला साजेसा खेळ दाखवू शकलेला नाही. आयपीएलमधील सर्वात जास्त वयाचा ४१ वर्षीय गिलख्रिस्ट आतापर्यंतच्या सात सामन्यांत १५, ९, ० , ७, २६, ४ अशा धावा काढू शकला आहे.
सामन्याची वेळ : रात्री ८ वा. पासून.

टॉम मूडी, हैदराबाद सनराजर्सचे प्रशिक्षक
शिखर धवनला सराव करताना पाहून फार आनंद झाला. तो पहिल्या सामन्यापासून फक्त काही पावलेच दूर आहे.

हरभजन सिंग, मुंबई इंडियन्स<br />तुम्ही शर्यतीची सुरुवात कशी करता ते महत्त्वाचे नाही, तर तुम्ही शर्यत पूर्ण कशी करता हे महत्त्वाचे आहे. पहिले षटक महागडे ठरले तरी विजयी षटकार खेचू शकलो. तुमचा पाठिंबा आणि प्रेमाबद्दल आभार!