घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सनी केलेल्या पराभवाचा बदला घेण्याची संधी कोलकाता नाइट रायडर्सकडे आहे. मात्र घरच्या मैदानावरची सुपर किंग्सची जबरदस्त कामगिरी बघता नाइट रायडर्सना विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागेल हे नक्की. किंग्स इलेव्हन पंजाबवर दणदणीत विजय मिळवत नाइट रायडर्स पुन्हा विजयपथावर परतले आहेत. जॅक कॅलिस दुखापतीतून सावरत फॉर्ममध्ये परतल्याने नाइट रायडर्सनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कर्णधार गौतम गंभीरला सूर गवसणे नाइट रायडर्ससाठी अत्यावश्यक आहे. मधल्या फळीत आणि नंतर सलामीलाही अपयशी ठरत असलेल्या युसुफ पठाणला संघात स्थान द्यायचे की नाही, हा नाइट रायडर्ससमोरचा प्रश्न आहे. इऑन मॉरगनही नाइट रायडर्ससाठी जमेची बाजू असणार आहे. पंजाबविरुद्ध अर्धशतक झळकावत मनविंदर बिस्लाने दणक्यात पुनरागमन केले आहे.
माइक हसी आणि महेंद्र सिंग धोनी ह चेन्नईसाठी तुरूप के एक्के आहेत. हसीने पाया रचायचा आणि धोनीने सामना जिंकून द्यायचा हे समीकरण चेन्नईसाठी आतापर्यंत तरी यशस्वी ठरले आहे. मात्र मुरली विजय आणि सुरेश रैनाचे धावांसाठी झगडणे चेन्नईच्या चिंता वाढवणारे आहे. मात्र ड्वेन ब्राव्हो, रवींद्र जडेजा, अल्बी मॉर्केल, ख्रिस मॉरिस या अष्टपैलूंमुळे चेन्नईचा संघ संतुलित वाटतो.
 गोलंदाजीच्या बाबतीत नाइट रायडर्स सुपर किंग्सच्या तुलनेत भक्कम आहेत. सुनील नरिन, सचित्र सेनानायके ही फिरकी जोडगोळी भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्यांच्या साथीला बालाजी, जॅक कॅलिस आणि रजत भाटियाही चांगली कामगिरी करीत आहेत. दुसरीकडे रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन यांच्यावर चेन्नईची भिस्त आहे. डर्क नॅन्सकडूनही चेन्नईला मोठय़ा अपेक्षा आहेत. ब्राव्हो, जडेजा गोलंदाज म्हणून उपयुक्त कामगिरी करीत आहेत.
गतविजेत्या कोलकात्याला नमवण्यासाठी चेन्नईचा संघ आतुर आहे. त्यामुळे गौतम गंभीर आणि महेंद्र सिंग धोनी यांच्या नेतृत्वाखालील संघांमध्ये जोरदार मुकाबला रंगणार हे नक्की.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वा.पासून
शुक्ला, तिवारी दुखापतग्रस्त
गुडघ्याच्या दुखापतीमुळे नाइट रायडर्सचा अष्टपैलू खेळाडू लक्ष्मीरतन शुक्ला उर्वरित हंगामात खेळू शकणार नाही तर हाताला झालेल्या दुखापतीमुळे मनोज तिवारी किमान आठवडाभर खेळू शकणार नाही. कोलकाता नाइट रायडर्सला फलंदाजीत मनोज तिवारीची उणीव भासणार आहे.
अष्टपैलू लक्ष्मीरतन शुक्ला उर्वरित हंगाम खेळू शकणार नसल्याने नाइट रायडर्सचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, या दोघांऐवजी सुमीत नरवाल आणि पारस डोगरा यांना संघात समाविष्ट करण्यात आल्याचे कोलकाता व्यवस्थापनाने स्पष्ट केले.