आयपीएलच्या पाचव्या पर्वाच्या अंतिम फेरीत ज्याने धडाकेबाज खेळी साकारून कोलकाता नाइट रायडर्सला विजेतेपद मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला तो मनविंदर बिस्ला अखेर संघाच्या तारणहार आला. पंजाबच्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बिस्लाच्या धडाकेबाज नाबाद ५१ धावांच्या जोरावर कोलकाताने पंजाबवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला.
पंजाबच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कोलकाताची २ बाद १० अशी दयनीय अवस्था झाली होती. पण यावेळी बिस्ला संघासाठी धावून आला. त्याने ४४ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद ५१ धावा फटकावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. बिस्लाला यावेळी जॅक कॅलिस (३७) आणि ईऑन मॉर्गन (४२) यांनी सुरेख साथ दिली.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारणाऱ्या पंजाबला २० षटकांत १४९ धावा करता आल्या. कर्णधार अ‍ॅडम गिलख्रिस्ट (२७) व मनदीप सिंग (२५) यांनी ४५ धावांची सलामी दिली. त्यानंतर मनन वोहराने सर्वाधिक ३१ धावांची खेळी साकारली, पण तो बाद झाल्यावर पंजाबच्या फलंदाजांना मोठे फटके मारता न आल्याने त्यांना १४९ धावांवर समाधान मानावे लागले.
संक्षिप्त धावफक
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटाकांत ६ बाद १४९ (मनन वोहरा ३१, अ‍ॅडम गिलख्रिस्ट २७; जॅक कॅलिस २/१४) पराभूत वि. कोलकाता नाइट रायडर्स : १८.२ षटकांत ४ बाद १५० (मनविंदर बिस्ला नाबाद ५१, इऑन मॉर्गन ४२; अझर मेहमूद ३/३५).
सामनावीर : जॅक कॅलिस.