कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध गतवर्षी आयपीएलच्या अंतिम फेरीत झालेल्या पराभवाचा सल अजूनही किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या मनात आहे. त्यामुळेच या पराभवाची परतफेड करण्यासाठी येथे घरच्या मैदानावर पंजाब उत्सुक आहे. शनिवारी
रात्री आठ वाजता हा सामना होणार आहे.
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात चाहत्यांना चौकार व षटकारांची आतषबाजी अपेक्षित आहे.  पंजाबने आतापर्यंत येथे झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. त्यांचा संघ कागदावरच बलाढय़ आहे हे दिसून आले आहे. झंझावाती टोलेबाजी करण्याबाबत ख्यातनाम असलेले डेव्हिड मिलर व ग्लेन मॅक्सवेल यांची बॅट अद्याप तळपलेली नाही. त्यांचे अपयश हीच कर्णधार जॉर्ज बेली याच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. वीरेंद्र सेहवाग, मुरली विजय, वृद्धिमान साहा व बेली यांच्यावरही फलंदाजीची भिस्त आहे.
मिचेल जॉन्सन, अनुरीत सिंग, संदीप शर्मा, रिषी धवन या अनुभवी गोलंदाजांना विकेट्स मिळत असल्या तरी त्यासाठी त्यांना खूपच धावा मोजाव्या लागल्या आहेत. विशेषत: शेवटच्या षटकांमध्ये त्यांची गोलंदाजी  प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरली आहे. त्यांच्याबरोबरच अक्षर पटेल याच्याकडूनही किंग्ज संघास प्रभावी गोलंदाजी अपेक्षित आहे.
तंदुरुस्त झालेला कर्णधार गौतम गंभीर याच्यासह मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, युसूफ पठाण यांच्याकडून कोलकाताला झंझावाती फलंदाजीची अपेक्षा आहे.  गोलंदाजीत सुनील नरेनने किफायतशीर गोलंदाजी केली असली तरी दोन सामन्यांमध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही हीच  गंभीरपुढील समस्या आहे. नरेन याच्याबरोबरच मॉर्ने मॉर्केल, युसुफ पठाण, पीयूष चावला यांच्यावरही कोलकाता संघाच्या गोलंदाजीची बाजू अवलंबून आहे.