सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यावर सलग दोन विजय मिळवल्यावर मुंबई इंडियन्सचा संघ विजयी हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाला आहे. रविवारी होणाऱ्या सामन्यात मुंबईची गाठ किंग्ज इलेव्हन पंजाबशी पडणार आहे.
मुंबईने दोन्ही विजय घरच्या मैदानात मिळवले असून फलंदाजीबरोबर गोलंदाजीमध्येही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. लेंडल सिमन्स, अंबाती रायुडू, किरॉन पोलार्ड चांगली फलंदाजी करत असले तरी कर्णधार रोहित शर्माला अजूनही मोठी खेळी साकारता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मिचेल मॅक्लेघन सातत्यपूर्ण कामगिरी करत असून त्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये सहा बळी मिळवले आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा भेदक मारा करत असून युवा फिरकीपटू जे. सुचितही चांगली गोलंदाजी करताना दिसत आहे. हा सामना मोहालीला होत असल्याने फिरकीपटू हरभजन सिंगकडून दमदार कामगिरीची अपेक्षा असेल.
एकामागून एक पराभव पदरी पडल्यामुळे पंजाबच्या खेळाडूंचे मनोबल खालावलेले असेल. कारण सध्याच्या घडीला ते फक्त चार गुणांनिशी गुणतालिकेत तळाशी आहेत. पण या सामन्यात त्यांना घरच्या मैदानाचा फायदा होऊ शकतो. पंजाबच्या संघाचे काही खरे दिसत नाही, कारण संघाने कर्णधार जॉर्ज बेलीला राखीव म्हणून खेळवले आहे. वीरेंद्र सेहवागला अजूनही छाप पाडता आलेली नाही. ग्लेन मॅक्सवेल, शॉन मार्श, डेव्हिड मिलर या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळवलेल्या खेळाडूंना सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
गोलंदाजीमध्ये मिचेल जॉन्सनला भेदक मारा करण्यात अपयश आले आहे. संघातील युवा भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून त्यांच्याकडून संघाला आता मोठय़ा अपेक्षा असतील.
वेळ : दु. ४.०० वा. पासून.
थेट प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सोनी पिक्स वाहिनीवर.