आयपीएल ट्वेंटी-२० क्रिकेट स्पध्रेत उशिरा का होईना सातत्यपूर्ण कामगिरी करून अव्वल चार संघांमध्ये स्थान निश्चित करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला पुढील फेरीतील दावेदारी भक्कम करण्यासाठी दुबळ्या किंग्ज इलेव्हन पंजाबचा सामना करावा लागणार आहे. ही लढत हैदराबाद घरच्या मैदानावर खेळणार असल्याने सनरायझर्सचे पारडे जड आहे.
विजय मिळवण्यासाठी सुरुवातीला चाचपडणाऱ्या सनरायझर्स संघाने डेव्हिड वॉर्नर याच्या नेतृत्वाखाली कामगिरीचा आलेख चढा ठेवला आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स संघावर ६ धावांनी विजय मिळवून त्यांनी गुणतालिकेत १२ गुणांसह चौथे स्थान काबीज केले. असे असले तरी मधल्या फळीचे अपयश ही सनरायझर्सची कमकुवत बाब आहे. सलामीवीर शिखर धवन आणि वॉर्नर यांच्या दमदार सुरुवातीनंतरही मधल्या फळीला मोठे लक्ष्य उभे करण्यात अपयश येत आहे. मॉइझेस हेन्रिक्स, ईऑन मॉर्गन आणि नमन ओझा या मधल्या फळीतील फलंदाजांनी एखाद दुसऱ्या लढतीत छाप सोडली आहे. हेन्रिक्सच्या दिल्लीविरुद्ध ४६ चेंडूंत ७४ धावांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे सनरायझर्सने अव्वल चौघांत स्थान मिळवले. गोलंदाजीत कर्ण शर्मा उपयुक्त मारा करत आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे डेल स्टेन, ट्रेंट बोल्ट, भुवनेश्वर कुमार आणि ईशांत शर्मा हे अनुभवी गोलंदाज आहेत.
दुसरीकडे पंजाबला दोन विजयांसह तळाला राहावे लागले आहे. गतउपविजेत्या पंजाबला लौकिकास साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. ग्लेन मॅक्सवेल आणि मिचेल जॉन्सन हे मोठे खेळाडूही छाप सोडण्यात अपयशी ठरले आहेत. पंजाबचे स्पध्रेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी उर्वरित लढती जिंकून अभिमानाने स्पध्रेबाहेर जाण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. मुरली विजय, मनन वोहरा, वृद्धिमान सहा, मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर यांना लौकिकानुसार खेळ करण्याची आवश्यकता आहे.
*सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
*थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स