चेन्नई सुपर किंग्जचे दोन आठवडय़ांचे लांबलेले विलगीकरण फलंदाजीच्या सरावावर परिणाम करणारे आणि नुकसानकारक ठरले, अशी सारवासारव कर्णधार महेंद्रसिंह धोनीने केली आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने त्याच्यावर बरीच टीका होत आहे. ‘‘मी बऱ्याच काळापासून फलंदाजी केलेली नाही. त्यातच १४ दिवसांचे विलगीकरण नुकसानीचे ठरले. २१७ धावांचे लक्ष्य गाठताना आक्रमक सुरुवात झाली नाही,’’ असे धोनीने सांगितले.

फ्लेमिंगकडून पाठराखण

चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी धोनीची पाठराखण केली. धोनीला वेळ देणे गरजेचे आहे.तो बराच काळ भरपूर क्रिकेट खेळलेला नाही. धोनीला सर्वोत्तम खेळ करण्यासाठी थोडा वेळ द्यावा,’’ असे फ्लेमिंग म्हणाले.

गंभीरकडून टीका

महेंद्रसिंह धोनीने संघ अडचणीत असताना  सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणे हे एका कर्णधाराला साजेसे नाही. धोनीने आघाडीवर राहून नेतृत्व करायला हवे होते,, अशी टीका माजी फलंदाज गौतम गंभीरने केली.