06 July 2020

News Flash

आणखी एक झुंज चेन्नईशी!

चेपॉकवरील रोमहर्षक लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सचा दोन धावांनी पराभव केला. आता ईडन गार्डन्सवर पुन्हा हेच प्रतिस्पर्धी गुरुवारी झुंजणार आहेत.

| April 30, 2015 12:28 pm

चेपॉकवरील रोमहर्षक लढतीत चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी कोलकाता नाइट रायडर्सचा दोन धावांनी पराभव केला. आता ईडन गार्डन्सवर पुन्हा हेच प्रतिस्पर्धी गुरुवारी झुंजणार आहेत. या पाश्र्वभूमीवर पराभवाची सव्याज परतफेड करण्यासाठी कोलकाताचा संघ उत्सुक आहे.
अखेरच्या चेंडूपर्यंत लढत देऊन वाटय़ाला आलेला पराभव हा कोलकाताचा या आधीचा सामना. या पाश्र्वभूमीवर त्यातून सावरत आयपीएल गुणतालिकेतील अव्वल संघाशी भिडण्याचे आव्हान त्यांच्यासमोर असेल. चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी सनरायझर्स हैदराबादविरुद्धची लढतसुद्धा कोलकाताने गमावली होती. त्यामुळे आव्हान टिकवण्यासाठी आता गतविजेत्या कोलकाताला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. सुदैवाने ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत.
आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील सर्वात सातत्यपूर्ण संघ असा लौकिक असलेल्या चेन्नईचे बलस्थान म्हणजे कर्णधार महेंद्रसिंग धोनी. क्षेत्ररक्षणाची रचना आणि गोलंदाजीतील बदल करण्यात धोनीचा हातखंडा. त्यामुळेच दोनदा आयपीएल विजेत्या चेन्नईला १३५ धावांच्या तुटपुंज्या आव्हानाचेही रक्षण करता आले.
दुखापतग्रस्त रविचंद्रन अश्विनच्या अनुपस्थितीत चेन्नईचा संघ खेळणार आहे. त्यामुळे डावखुरा फिरकी गोलंदाज पवन नेगी किंवा लेग-स्पिनर राहुल शर्मा यांना संधी मिळू शकते. याशिवाय ईश्वर पांडेऐवजी धोनी इरफान पठाणला संघात स्थान देऊ शकेल. ईश्वरच्या २ षटकांत प्रतिस्पर्धी संघाने १८ धावा काढल्या होत्या.
कोलकाता नाइट रायडर्सच्या संघाची प्रमुख मदार आहे ती गोलंदाजीवर. सुनील नरिनच्या अनुपस्थितीतही कोलकाताने चेन्नईला ६ बाद १३४ धावांवर रोखले. रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, सूर्यकुमार यादव, युसूफ पठाण यांच्याकडून सातत्यपूर्ण फलंदाजीची अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे कर्णधार गौतम गंभीरवर पूर्ण संघाची भिस्त असते. गंभीरने आतापर्यंत तीन अर्धशतके झळकावली आहेत. चेन्नईविरुद्ध मात्र त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या रयान टेन डोइश्चॅटने आव्हानाचा पाठलाग करताना जबाबदारीने खेळ केला. परंतु यादव किंवा पठाणकडून त्याला योग्य साथ लाभली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2015 12:28 pm

Web Title: match preview of chennai super kings vs kolkata knight riders
Next Stories
1 चाणाक्ष धोनी!
2 पराभवाचा बदला घेण्यासाठी राजस्थान सज्ज
3 आयपीएल: फिरकीपटू सुनील नरिनवर ‘ऑफ स्पिन’ टाकण्याची बंदी
Just Now!
X