घरच्या मैदानावर आम्ही शेर असल्याचे पुन्हा एकदा दाखवत मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर आठ धावांनी विजय मिळवत मुंबईकर खेळाडूंपेक्षा मुंबईचा संघच सरस असल्याचे दाखवून दिले. अंबाती रायुडूच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबईने १८७ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा बचाव करताना मिचेल मॅक्लेघनने भेदक मारा करत राजस्थानला एकामागून एक तीन धक्के देत मुंबईला विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
मुंबईच्या १८८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मॅक्लेघनच्या पहिल्याच षटकाच्या पाचव्या चेंडूवर अजिंक्य रहाणेचा (१६) सोपा झेल जे. सुचितने सोडला. पण या जीवदानाचा घरच्या मैदानावर अजिंक्यला जास्त फायदा उचलता आला नाही. अजिंक्यला जीवदान देणाऱ्या सुचितने वैयक्तिक तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार शेन वॉटसनला (२८) त्रिफळाचीत करत संघाला मोठे यश मिळवून दिले. अजिंक्य आणि वॉटसन हे दोन्ही महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यावरही संजू सॅमसनने धावफलक हलता ठेवण्याची जबाबदारी चोख बजावली होती. एकीकडे सॅमसन सुंदर फलंदाजी करत असतानाही मॅक्लेघनने १५व्या षटकांत फक्त तीन धावा देत स्मिथला माघारी धाडले. या षटकामध्येच सॅमसनने पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत अर्धशतक साजरे केले. विनय कुमार, लसिथ मलिंगा यांच्या गोलंदाजीवर आक्रमण करत सॅमसनने राजस्थानचा विजय दृष्टीपथात आणला होता, पण मॅक्लेघनने त्याचा अडसर दूर केला आणि मुंबईसहित मुंबईकरांना हायसे वाटले. सॅमसनने ४६ चेंडूंत ७ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. याच षटकात मॅक्लेघनने करुण नायरलाही बाद करत राजस्थानला बॅकफूटवर ढकलले आणि राजस्थानच्या हातून सामना निसटला.
तत्पूर्वी, लेंडल सिमन्सला (३८) दुसऱ्याच चेंडूवर जीवदान मिळाले खरे, पण त्याला गेल्या सामन्यासारखी मोठी खेळी साकारता आली नाही. सिमन्स आणि पार्थिव पटेल (२३) या दोघांनी ४.५ षटकांत ४३ धावांची सलामी दिली. मुंबईकर धवल कुलकर्णीने दमदार फलंदाजी करणाऱ्या पटेलला बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. स्वत:च्याच गोलंदाजीवर धवलने अप्रतिम झेल टिपला. पटेलसह मुंबईने तीन फलंदाज अवघ्या ४१ धावांमध्ये गमावले. कर्णधार रोहित शर्माने चांगली सुरुवात केली. धवल कुलकर्णीच्या १५ षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने मिड विकेटला दणकेबाज षटकार लगावला. पारंपरिक क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या रोहितने त्यानंतरच्याच चेंडूवर अपारंपरिक फटका मारण्याची घोडचूक केली आणि तीच त्याला भोवली. रोहित बाद झाल्यावर १६ षटकांमध्ये मुंबईची ४ बाद १२६ अशी अवस्था होती. पण त्यानंतर मात्र अंबाती रायुडू आणि किरॉन पोलार्ड यांनी गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. शेन वॉटसनच्या १८व्या षटकांत या दोघांनी २० धावा वसूल केल्या, त्यानंतरच्या १९ व्या षटकांतही १६ धावा काढल्या. या दोघांनी तडफदार फलंदाजी करत पाचव्या विकेटसाठी २९ चेंडूंमध्ये ६१ धावांची लूट केली. पोलार्ड बाद झाल्यावरही रायुडूने आक्रमकपणा कायम ठेवत अखेरच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर थर्ड मॅनला चौकार लगावत अर्धशतक झळकावले. रायुडूने २७ चेंडूंत ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर नाबाद ५३ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ५ बाद १८७ (अंबाती रायुडू नाबाद ५३; धवल कुलकर्णी २/२६) विजयी वि. राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ७ बाद १७९ (संजू सॅमसन ७६, मिचेल मॅक्लेघन ३/३१).
सामनावीर : अंबाती रायुडू.