दमदार फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी दिलेल्या योग्य साथीच्या बळावर मुंबई इंडियन्सने आयपीएल ट्वेंटी-२० क्रिकेट स्पध्रेत रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबवर २३ धावांनी विजय साजरा केला. लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांच्या अर्धशतकांच्या बळावर मुंबईने पंजाबसमोर १७२ धावांचे आव्हान उभे केले आणि गोलंदाजांनी टिच्चून मारा करत पंजाबला १४९ धावांवरच समाधान मानण्यास भाग पाडले. या विजयाबरोबर मुंबईने स्पध्रेतील आव्हान अद्याप कायम राखण्यात यश मिळवले आहे.
 स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी उर्वरित लढतींमध्ये विजय मिळवण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना १७२ धावांचा डोंगर उभा केला. सलामीवीर लेंडल सिमन्स आणि पार्थिव पटेल यांनी पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई करत शतकी सलामी दिली. पार्थिव-सिमन्सने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करताना पंजाबच्या गोलंदाजांची लय बिघडवली.  त्याला नशिबाचीही साथ लाभली. पंजाबच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत मुंबईने दमदार फटकेबाजी केली. राजस्थान रॉयल्सवरील विजयामुळे नवचैतन्य संचारलेल्या मुंबईने दमदार सुरुवात केली. १३व्या षटकात ही जोडी करणवीर सिंगने तोडली. ३६ चेंडूंत ५ चौकार व ३ खणखणीत षटकार खेचून ५९ धावा करणाऱ्या पार्थिवला त्याने माघारी धाडले. त्यानंतर रोहित शर्माने संयमी खेळ करताना सिमन्सला साजेशी साथ दिली. सुरुवातीला संयमी खेळ करणाऱ्या सिमन्सने फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले. १८व्या षटकात मिचेल जॉन्सनने रोहितला (२६) बाद करून ही जोडी तोडली. मात्र, दुसरीकडून सिमन्स धावांची आतषबाजी करत होता. अखेरच्या षटकात अनुरीत सिंगने त्याला झेलबाद केले. सिमन्सने ५६ चेंडूंत ९ चौकार व १ षटकार खेचून ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. किरॉन पोलार्ड (७) आणि अंबाती रायडू (४) यांनी नाबाद राहताना संघाला ३ बाद १७२ धावांचा पल्ला गाठून दिला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबची दमछाक झाली. वीरेंद्र सेहवाग (२) व ग्लेन मॅक्सवेल (१२) हे हुकमी एक्के अपयशी ठरल्याने पंजाबवर दडपण वाढले. या दडपणातही मुरली विजय आणि डेव्हिड मिलर यांनी संघाच्या डावाला आकार दिला. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ४८ धावांची भागीदारी करून संघाला शतकी पल्ला गाठून दिला. १२व्या षटकात हरभजन सिंगने विजयला (३९) माघारी धाडून पंजाबच्या विजयावर पाणी फेरले. त्यापाठोपाठ मिलरही (४३) लसिथ मलिंगाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या जॉर्ज बेली आणि वृद्धिमान साहा यांनी औपचारिकता म्हणून २० षटके खेळून काढली.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : ३ बाद १७२ (लेंडल सिमन्स ७१, पार्थिव पटेल ५९, रोहित शर्मा २६; अनुरीत सिंग १/३०) विजयी वि. किंग्ज इलेव्हन पंजाब : ७ बाद १४९ (मुरली विजय ३९, डेव्हिड मिलर ४३; लसिथ मलिंगा २/३१).
सामनावीर :  लेंडल सिमन्स