सलग पाच विजयांसह मुंबई इंडियन्सने बाद फेरीच्या दिशेने दमदार पाऊल टाकले असले तरी रविवारी होणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवून त्यांना चौथे स्थान कायम राखता येऊ शकते. ज्या वानखेडे स्टेडियमवरून मुंबईने विजयाच्या मालिकेला सुरुवात केली त्याच मैदानावर विजयी षटकार ठोकण्याची त्यांच्याकडे नामी संधी असेल.
गेल्या सामन्यात चेन्नईविरुद्ध खेळताना मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे काम चोख बजावले होते. पण त्यांना अखेरच्या पाच षटकांमध्ये अपेक्षित गोलंदाजी करता आली नव्हती. त्यामुळे या निर्णायक षटकांचा विचार मुंबईने करायला हवा. लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, मिचेल मॅक्लेघन आणि उदयोन्मुख जगदीश सुचित चांगला मारा करत आहेत. या सामन्यात मुंबईला दमदार सलामी मिळाली असली तरी त्यानंतर मात्र त्यांचा डाव अडचणीत सापडला होता. पार्थिव पटेल आणि लेंडल सिमन्स चांगल्या फॉर्मात आहेत. पण किरॉन पोलार्ड आणि रोहित शर्मा यांना अजूनही सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. गेल्या सामन्यात हार्दिक पंडय़ाने १९व्या षटकात तीन षटकार लगावत संघाला विजय मिळवून दिला होता, त्याच्याकडून या सामन्यात अपेक्षा वाढल्या असतील.
ख्रिस गेल, ए बी डी’व्हिलियर्स आणि कर्णधार विराट कोहली हे धडाकेबाज फलंदाज चांगल्या फॉर्मात असून संघासाठी ही आनंदाची गोष्ट आहे. पण या तिघांनंतर मात्र मोठी खेळी साकारणारा फलंदाज संघात दिसत नाही. गोलंदाजीमध्ये मिचेल स्टार्कला चांगला सूर गवसला असून त्याच्याकडून भेदक मारा पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर फिरकीपटू युझवेंद्र चहलनेही अचूक मारा करत बळी मिळवले आहेत.