आयपीएलसारखी ट्वेन्टी-२० लीग फक्त फलंदाजीच्या जोरावर जिंकता येते, हे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी वानखेडेवर शनिवारी खोडून काढले. गुणवत्तेवर असलेला विश्वास आणि त्याला अतूट मेहनतीची जोड दिली, तर यश तुमचेच असते हे मुंबईच्या गोलंदाजांनी दाखवून दिले. पहिल्यांदा फलंदाजी करताना मुंबईला १५७ धावा जमवता आल्या होत्या, ज्या माफकच होत्या. पण वेगवान भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने सनरायझर्स हैदराबादवर २० धावांनी विजय मिळवत सातव्या सामन्यात दुसऱ्या विजयाची नोंद केली.  मिचेल मॅक्लेघान आणि लसिथ मलिंगा यांनी भेदक मारा करत हैदराबादच्या फलंदाजांच्या नाकी नऊ आणले. त्यांनी फक्त धावांना वेसण घातली नाही, तर एकामागून एक फलंदाजांना बाद करत मुंबईच्या विजयाचा शामियाना तयार केला आणि मुंबईला घरवापसी चांगलीच फळल्याचे दिसून आले. चार विकेट्स मिळवणाऱ्या मलिंगाला या वेळी सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना हरभजन सिंगच्या पहिल्याच चेंडूवर सलामीवीर शिखर धवनने चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. त्यानंतर हरभजनच्या दुसऱ्या षटकात धवनने तीन चौकार आणि एका षटकारासह १८ धावांची लूट केली आणि मुंबई पुन्हा सामना गमावणार का, अशी चिंता चाहत्यांना वाटायला लागली. पण त्यानंतरच्या पाचव्या षटकात लसिथ मलिंगाने फॉर्मात असलेल्या डेव्हिड वॉर्नरला (९) तंबूत धाडले आणि मुंबईला हायसे वाटले. वॉर्नर बाद झाला असला तरी धवन आपल्याच फटकेबाजीमध्ये मश्गूल होता. मिचेल मॅक्लेघानच्या सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरही त्याने चौकार लगावला. पण याच षटकाच्या शेवटच्या चेंडूने त्याचा घात केला. मॅक्लेघनच्या आखूड टप्प्याचा चेंडूवर धवनने कसाबसा ‘पुल’चा फटका मारला आणि ‘मिड विकेट’ला उभ्या असलेल्या मलिंगाने अप्रतिम झेल टिपत धवनला माघारी धाडले.
त्यानंतर मॅक्लेघानने के. एल. राहुल (२५) आणि रवी बोपारा (२३) या स्थिरस्थावर झालेल्या फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या महत्त्वाच्या तीन फलंदाजांना बाद करत मॅक्लेघानने हैदराबादची विजयापर्यंत जाणारी वाट रोखली. त्यानंतर १९ व्या षटकातील पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर मलिंगाने विकेट मिळवल्या खऱ्या, पण त्याची हॅट्ट्रिक मात्र हुकली. मलिंगाने या सामन्यात २३ धावांत चार विकेट्स मिळवल्या, तर मॅक्लेघानने २० धावांमध्ये तीन फलंदाजांना माघारी धाडले.
तत्पूर्वी, लेंडल सिमन्सचे संयमी अर्धशतक आणि कर्णधार रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड यांच्या उपयुक्त खेळींच्या जोरावर मुंबईने १५७ धावांपर्यंत मजल मारली. मुंबईची सुरुवात फारशी चांगली झाली नव्हती. पण सिमन्सने एक बाजू लावून धरत हैदराबादचे आक्रमण थोपवून धरले होते. पण अर्धशतक पूर्ण केल्यावर डेल स्टेनने त्याला त्रिफळाचीत करत संघाला मोठे यश मिळवून दिले. सिमन्सने ४२ चेंडूंत ६ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५१ धावा केल्या. सिमन्स बाद झाल्यावर रोहित आणि पोलार्ड यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण या दोघांनाही मोठी खेळी साकारता आली नाही. रोहितने मोठे फटके मारत १५ चेंडूंमध्ये २४ धावा केल्या, त्यामध्ये २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. रोहित बाद झाल्यावर सर्व जबाबदारी पोलार्डवर येऊन पडली. पोलार्डने २३ चेंडूंत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३३ धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने पोलार्डसह त्यानंतर अन्य दोन फलंदजांना बाद करत मुंबईला अखेरच्या षटकांमध्ये मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवले.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ८ बाद १५७ (लेंडल सिमन्स ५१, किरॉन पोलार्ड ३३; भुवनेश्वर कुमार ३/२६). विजयी वि. : सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १३७. (शिखर धवन ४२; मिचेल मॅक्लेघान ३/२०, लसिथ मलिंगा ४/२३).
सामनावीर : लसिथ मलिंगा.

‘एज्युकेशन’ची ऐशीतैशी
*मुंबई इंडियन्स-रिलायन्स फाऊंडेशनने ‘एज्युकेशन फॉर ऑल’ या उपक्रमाअंतर्गत तब्बल सतरा हजार शालेय मुलांना सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यासाठी आणले होते. या मुलांनी सामना संपल्यावर त्यांना देण्यात आलेले पॅकबंद पाण्याचे ग्लास मैदानावर फेकायला सुरुवात केली.
*छायाचित्रकार, सुरक्षारक्षक आणि चीअर लीडर्स यांना याचा चांगलाच फटका बसला. सुरक्षारक्षक मुलांना हे कृत्य थांबवण्यासाठी  विनवणी करत होते, पण ही मुलं जवळपास १० मिनिटे पाण्याचे ग्लास फेकतच राहिले आणि मैदानावर या शेकडो ग्लासचा कचरा जमा झाला.
*मुंबईच्या संघ मालकीण नीता अंबानी फेरा मारण्यासाठी आल्या तेव्हाही अल्प प्रमाणात मुलांनी हा प्रकार केला. या साऱ्या प्रकारामुळे या मुलांना नेमके कोणते शिक्षण दिले जाते, हा प्रश्न उपस्थित प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिला आणि एज्युकेशनची ऐशीतैशी याचि देही याचि डोळा अनुभवायला मिळाली.