04 December 2020

News Flash

मुंबई इंडियन्स अंतिम फेरीत

एकापेक्षा एक दिग्गज मागदर्शकांचा मोठा ताफा असलेल्या मुंबई इंडियन्सने रडत-खडत खेळत साखळीच्या अखेरच्या सामन्यात बाद फेरीचा टप्पा गाठला.

| May 20, 2015 12:48 pm

एकापेक्षा एक दिग्गज मागदर्शकांचा मोठा ताफा असलेल्या मुंबई इंडियन्सने रडत-खडत खेळत साखळीच्या अखेरच्या सामन्यात बाद फेरीचा टप्पा गाठला. मात्र वानखेडे स्टेडियमवर ‘क्वॉलिफायर-१’मध्ये स्वप्नवत कामगिरीचा नजराणा पेश करीत मुंबईने बलाढय़ चेन्नई सुपर किंग्जला २५ धावांनी पराभूत केले आणि आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत तिसऱ्यांदा स्थान मिळवले आहे.
लसिथ मलिंगाने पहिल्याच षटकात ड्वेन स्मिथला भोपळाही न फोडता तंबूची वाट दाखवली आणि चेन्नईला पहिला धक्का बसला. त्यानंतर फॅफ डय़ू प्लेसिस (४५), सुरेश रैना (२५) आणि आर. अश्विन (२३) यांनी चेन्नईच्या धावसंख्येला स्थर्य देण्याचा प्रयत्न केला. हरभजन सिंगने रैना आणि महेंद्रसिंग धोनी (०) यांना लागोपाठच्या चेंडूवर बाद करून सामन्याची सूत्रे मुंबईच्या हाती मिळवून दिली. मग चेन्नईचा डाव १६२ धावांत संपुष्टात आला. मलिंगाने २३ धावांत ३ बळी घेतले. विनय कुमार आणि हरभजन सिंगने प्रत्येकी दोन बळी घेतले.
त्याआधी, सलामीवीर लेंडल सिमन्सच्या धडाकेबाज अर्धशतकाच्या बळावर मुंबई इंडियन्सने ६ बाद १८७ धावांचे आव्हान उभे केले. पार्थिव पटेल आणि किरॉन पोलार्ड यांनीसुद्धा या धावसंख्येत आपले महत्त्वाचे योगदान दिले. चेन्नईकडून ड्वेन ब्राव्हो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ४० धावा देत पार्थिव पटेल, रोहित शर्मा व किरॉन पोलार्ड हे तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. रवींद्र जडेजाने तीन सुरेख झेल टिपले, तर सुरेश रैनाने दोन झेल घेतले.
चेन्नईने अश्विनच्या फिरकीच्या बळावर सुरुवातीच्या षटकांमध्ये मुंबईला जखडून ठेवले. मुंबईच्या धावफलकावर ३ षटकांत फक्त १५ धावा लागल्या. मग सिमन्स आणि पटेल जोडीने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीतील आवेशातच सलामी दिली. या जोडीने १०.४ षटके किल्ला लढवून ९० धावांची दमदार सलामी नोंदवली. पार्थिवचा (३५) अडसर ड्वेन ब्राव्होने दूर करून ही जोडी फोडली आणि आपल्या आयपीएल कारकीर्दीतील १००व्या बळीची नोंद केली. सिमन्स बेफाम फलंदाजी करीत होता. परंतु जडेजाच्या गोलंदाजीवर पवन नेगीने डीप कव्हरवर सिमन्सचा झेल टिपून त्याला तंबूची वाट दाखवली. सिमन्सने ५१ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी करीत आपली ६५ धावांची खेळी उभारली. मग रोहितला फक्त १९ धावाच काढता आल्या.
त्यानंतर किरॉन पोलार्डने मधल्या फळीतील फलंदाजांना हाताशी धरून अखेरच्या षटकांमध्ये धावांचा प्रवाह वाढवण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो अखेरच्या षटकात ब्राव्होचा बळी ठरला. पोलार्डने फक्त १७ चेंडूंत एक चौकार आणि पाच षटकारांसह ४१ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : २० षटकांत ६ बाद १८७ (लेंडल सिमन्स ६५, किरॉन पोलार्ड ४१, पार्थिव पटेल ३५; ड्वेन ब्राव्हो ३/४०) विजयी विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज : १९ षटकांत सर्वबाद १६२ (फॅफ डू प्लेसिस ४५, लसिथ मलिंगा ३/२३, हरभजन सिंग २/२६)
सामनावीर : लेंडल सिमन्स.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2015 12:48 pm

Web Title: mumbai indians beat chennai super kings by 25 runs
Next Stories
1 दोषी विराट कोहलीला फक्त समज
2 आज काही तुफानी करू या!
3 बांगलादेश दौरा माझ्यासाठी नवी सुरूवात- हरभजन सिंग
Just Now!
X