सलग तिसऱ्या विजयामुळे आत्मविश्वास द्विगुणित झालेल्या मुंबई इंडियन्सला मंगळवारी सातत्याचा अभाव असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सचा सामना करावा लागणार आहे. वानखेडे स्टेडियमवर ही लढत होणार असली तरी दिल्ली कोणत्याही क्षणी सामन्यात फेरफार करू शकते. त्यामुळे स्पध्रेतील आव्हान टिकवण्यासाठी मुंबईला सातत्यपूर्ण खेळ करणे गरजेचे आहे.
गुणतालिकेत तळाला असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबवर २३ धावांनी विजय मिळवून मुंबईचे मनोबल उंचावले आहे. दुसरीकडे मात्र यशापयशाच्या झोक्यावर असलेल्या दिल्लीला रविवारी राजस्थान रॉयल्सकडून सपाटून मार खावा लागला. त्यामुळे मंगळवारच्या लढतीत मुंबई सकारात्मक मानसिकतेने मैदानात उतरेल. मुंबई व दिल्ली या दोन्ही संघांच्या खात्यात ९ सामन्यांनंतर ८ गुण जमा आहेत, परंतु सरासरीत दिल्ली वरचढ आहे.
सलामीवीर पार्थिव पटेल याचा फॉर्म परत आल्याने मुंबईसमोरील मोठी अडचण दूर झाली आहे. पटेलने पंजाबविरुद्ध यंदाच्या सत्रातील पहिल्या अर्धशतकाची नोंद करताना लेंडल सिमन्ससह शतकी भागीदारी केली होती. या दमदार सलामीनंतर मुंबईकडे मधली फळी सांभाळण्यासाठी सर्वोत्तम फलंदाजांची फौज आहे. गोलंदाजीतही लसिथ मलिंगा, हरभजन सिंग आणि मिचेल मॅक्लेघन हे अनुभवी खेळाडू असल्याने मुंबईचे पारडे जड आहे.
दुसरीकडे दिल्लीला अद्यापही सातत्य राखता आलेला नाही. कर्णधार जे.पी. डय़ुमिनी आणि श्रेयस अय्यर यांनी आतापर्यंत फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. मात्र मयांक अग्रवाल, युवराज सिंग, केदार जाधव़, मॅथ्युज यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. झहीर खानच्या पुनरागमनामुळे दिल्लीची गोलंदाजी बळकट झाली आहे. नॅथन कोल्टर नीलसह इम्रान ताहीर आणि अमित मिश्रा यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी आहे. डय़ुमिनीची फिरकीही दिल्लीसाठी उपयुक्त आहे.
प्रतिस्पर्धी संघ-मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), एडन ब्लिझार्ड, जसप्रीत बुमराह, उन्मुक्त चंद, र्मचट डि लॉन्ज, श्रेयस गोपाळ, हरभजन सिंग, सिद्धेश लाड, मिचेल मॅक्लेघान, लसिथ मलिंगा, अभिमन्यू मिथुन, प्रग्यान ओझा, पार्थिव पटेल, कीरेन पोलार्ड, अंबाती रायुडू, लेंडल सिमन्स, कॉलिन मुन्रो, बेन हिल्फेनहॉस. दिल्ली डेअरडेव्हिल्स-जेपी डय़ुमिनी (कर्णधार), युवराज सिंग, क्विंटन डि कॉक, मयांक अगरवाल,  नॅथन कोल्टर नील, डॉमिनिक जोसेफ, चिदंबरम गौतम,  इम्रान ताहीर, श्रेयस अय्यर, केदार जाधव, झहीर खान, अँजेलो मॅथ्यूज, अमित मिश्रा, अ‍ॅल्बी मॉर्केल, शाहबाज नदीम, गुरिंदर संधू,  मनोज तिवारी, सौरभ तिवारी, जयदेव उनाडकत.
सामन्याची वेळ : रात्री ८ वाजल्यापासून थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स