‘आयपीएलमधील महाशक्ती’ असे बिरुद मिरविणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जला हरविल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या आशा उंचावल्या आहेत. मंगळवारी वानखेडे स्टेडियमच्या घरच्या मैदानावर मुंबईची गाठ पडणार आहे ती सांघिकदृष्टय़ा झगडणाऱ्या दिल्ली डेअरडेव्हिल्सशी. त्यामुळे मुंबई इंडियन्स शानदार विजयानिशी आपल्या खात्यावरील गुणसंख्या वाढविण्याची चिन्हे आहेत.
रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सच्या संघाने सलामीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अटीतटीची टक्कर दिली. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात दुर्दैवाने मुंबईला २ धावांनी पराभव पत्करावा लागला. परंतु त्यानंतर चेपॉकवर चेन्नई सुपर किंग्जच्या बालेकिल्ल्यावर मुंबईने ९ धावांनी जोशपूर्ण विजयाची नोंद केली. मुंबईची फलंदाजीची फळी अद्याप पूर्णार्थाने मैदानावर सिद्ध होऊ शकलेली नसली तरी या संघाकडे अष्टपैलू सामथ्र्य निश्चितच आहे.
चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सचिन तेंडुलकर आणि पाँटिंग ही अनुभवी सलामीची जोडी पहिल्या २० चेंडूंमध्ये तंबूत परतली होती. या सामन्यात सचिनला भोपळाही फोडता आला नव्हता. चेन्नईच्या सामन्यात जाणवलेली ती उणीव या दिग्गज खेळाडूंनी वानखेडेवर भरून काढावी, ही मुंबईच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.
यष्टिरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक आपला धडाकेबाज फॉर्म टिकवून आहे. याचप्रमाणे वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात ३८ चेंडूंत तडाखेबाज ५७ धावा काढून साऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडले होते. वारंवार अपयशी ठरणारा मुंबईचा रोहित शर्मा फॉर्मच्या शोधात आहे. तथापि, अंबाती रायुडूला दोन सामन्यांत फक्त २५ धावाच काढता आल्या आहेत.
दुखापतीमुळे श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा पहिल्या दोन सामन्यांत खेळू शकला नव्हता. पण तोही आता परतल्यामुळे लंकेचा गोलंदाजीचा मारा अधिक समर्थ झाला आहे. बंगळुरूविरुद्ध नवोदित जसप्रीत बुमराहने ३२ धावांत ३ बळी घेतले होते, तर मुनाफ पटेलने चेन्नईविरुद्ध २९ धावांत ३ बळी घेतले.
दुसरीकडे आयपीएलच्या सहाव्या पर्वात पहिले दोन्ही सामने गमावल्यामुळे दिल्लीची गाडी पुन्हा रुळावर येण्यासाठी त्यांना या विजयाची नितांत आवश्यकता आहे. दिल्लीचा संघनायक महेला जयवर्धनेसुद्धा याबाबत आशावादी आहे. सलामीच्या सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्सने दिल्लीच्या संघावर ६ विकेट राखून विजय मिळवला होता, तर दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून त्यांचा ५ धावांनी पराभव झाला. मधल्या फळीची चिंता दिल्लीला तीव्रतेने सतावते आहे. याशिवाय दुखापतग्रस्त केव्हिन पीटरसन आणि जेसी रायडर यांची अनुपस्थिती त्यांच्या चिंतेत आणखी भर घालत आहे. याचप्रमाणे धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग पाठीच्या दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यात खेळू शकला नव्हता. तो परतल्यास दिल्लीची फलंदाजीची फळी आणखी मजबूत होऊ शकते.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर चांगलाच बरसतो आहे. राजस्थानविरुद्ध त्याने ९ चौकार आणि एका षटकारासह ५६ चेंडूंत ७७ धावा कुटल्या होत्या.
भारताला युवा विश्वचषक जिंकून देणाऱ्या कर्णधार उन्मुक्त चंदने मुश्ताक अली स्पध्रेत दोन सलग शतके झळकावली होती. परंतु आयपीएलमध्ये तो धावांसाठी झगडत असल्याचे दिसून आले आहे. गतवर्षी पर्पल कॅप जिंकणाऱ्या मॉर्नी मॉर्केलच्या अनुपस्थितीत दिल्लीची गोलंदाजीची फळीसुद्धा कमजोर झाली आहे.