आधीच्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्याची कसर या सामन्यात भरून काढायची या इराद्याने उतरलेल्या मुंबई इंडियन्ससंघाचा कर्णधार रिकी पॉंटिंग आणि मास्टर ब्लास्टर सचिनने सुरूवातीपासूनच धडाकेबाज फलंदाजीला सुरूवात केली. ‘पॉवर प्ले’च्या पहिल्या सहा षटकांचा पुरेपूर फायदा घेत मुंबईच्या संघाच्या धावसंख्येला या दोन फलंदाजांनी योग्य दिशा देण्यासाठी सुरूवात केली आणि सहावे षटक संपण्यापूर्वीच मुंबईने पन्नास धावांचा आकडा गाठला.      त्यांनतर कर्णधार रिकी पाँटिंग युवराज सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्यापाठोपाठ सचिनही संघाची ६० धावसंख्या असताना माघारी परतला पण या साठ धावांमध्ये सचिनच्या व्ययक्तीक ४४ धावांचा समावेश होता. गेल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करणारा दिनेश कार्तिक स्टेडियममध्ये उतरला आणि पहिल्या चेंडूवर षटकार खेचत आपला जिंकण्याचा इरादा पक्का असल्याचे पुणे वॉरियर्सला दाखवून दिले. त्यासोबत रोहीत शर्माचीही बॅट आज चांगलीच तळपत होती. रोहीत आणि कॅरेबियन खेळाडू कॅरन पोलार्डने मैदानाची धुरा सांभाळत पुणे वॉरियर्स समोर १८३ धावांचा डोंगर रचला.
१८३ धावांचे आव्हान स्विकारत फलंदाजीला उतरलेल्या पुण्याच्या संघाची सुरूवात खराब झाली. अगदी पहिल्या चेंडूवर फिंच त्रिफळाबाद झाला. त्यानंतर पुण्याच्या संघाची फलंदाजी कोसळली. त्यापाठोपाठ टेलरही धावचित झाला. उथप्पा स्टेडियमवर असे पर्यंत पुण्याच्या जिंकण्याच्या आशा कायम होत्या पण तोही त्याच्या व्ययक्तीक अवघ्या सात धावांवर बाद झाला. संघाचा कर्णधार युवराज सिंगने डाव सावरण्यास सुरुवात केली खरी पण, तोही संघाची ७५ धावसंख्या असताना बाद झाला. युवराज तंबूत परतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या विजय निच्छित झाला. कारण त्याच्या स्टेडियमवर उतरलेल्या पुण्याच्या खेळाडूंनी बाद होण्याची रांगच सुरू केली आणि सरते शेवटी मुंबईने ४४ धावांनी सामना जिंकला.