मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडियन  प्रीमियर लीग (आयपीएल) च्या सामन्यांसाठी मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. यंदाही पोलिसांनी आयपीएलसाठी चोख बंदोबस्त ठेवला आहे. मुंबईत आयपीएलचे एकूण आठ सामने होणार असून एप्रिल महिन्यात चार सामने होणार आहेत. गेल्या वर्षी जो बंदोबस्त देण्यात आला होता, तोच बंदोबस्त यंदाही देण्यात येणार आहे. शीघ्र कृती दल तैनात करण्यात आले आहे. सध्या तरी कुठल्याही प्रकारच्या धोक्याची सूचना नसली तरी आम्ही पुरेशी काळजी घेतली असल्याचे पोलीस उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. सामन्यांच्या दरम्यान २ पोलीस उपायुक्त, १० सहाय्यक पोलीस आयुक्त, ३५ पोलीस निरीक्षक, ७५० पोलीस कर्मचारी, २५० महिला पोलीस कर्मचारी आदींचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय शीघ्र कृती दलही तैनात करण्यात येणार
आहे. मात्र राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडया यंदा तैनात करण्यात येणार नाहीत.