‘सिर्फ देखनेका नही’.. आयपीएलचा धमाका सुरू होण्याआधीच जाहिरातींमुळे घराघरांत पोहोचलेले हे शब्द जसेच्या तसे उचलून, सामन्यांची अचूक भाकिते वर्तविणाऱ्या ऑनलाईन सट्टेबाजीला आयपीएलच्या सामन्यांसोबत बहर येत गेल्याचे माहिती महाजालावरील असंख्य ‘बेटिंग टिप्स’ साईटसवरून दिसते. आयपीएलच्या जाहिरातीतील या ‘कॅचलाईन’चाच नेमका वापर करून सामन्यांची भाकिते वर्तविण्याच्या अनुभवांचे भांडवल केले जात असून, ‘सिर्फ देखनेका नही, पैसा भी कमानेका’, असा संदेशही दिला जात आहे.
‘ही वेबसाईट केवळ इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि ज्या देशात बेटिंग कायदेशीर आहे त्या देशांतील लोकांसाठी आहे.. तुम्ही भारतीय असाल, तर कृपया पुन्हा या साईटला भेट देऊ नका. कारण भारतात बेटिंगला कायदेशीर मान्यता नाही’.. अशी सुरक्षित तळटीप असलेल्या अनेक वेबसाईटसवरून क्रिकेटच्या सामन्यांमधील क्षणाक्षणावर सट्टेबाजी सुरू असते.  आयपीएलमधील सट्टेबाजीचा प्रकार उघडकीस आल्यानंतरही अनेक साईटसवर लाईव्ह सट्टय़ाची गंमत पाहावयास मिळत असल्याने, शौकिन सट्टेबाजांना घरबसल्या पैसा कमावण्याच्या संधी सहज उपलब्ध असल्याचे मानले जात आहे. काही वेबसाईटस या क्षेत्रातील आपल्या प्रदीर्घ अनुभवाचीच जाहिरातबाजी करून आपले आडाखे कसे तंतोतंत आणि अचूक असतात, याची वर्णने करतातच, शिवाय, क्रिकेटच्या क्षेत्रातील बडय़ांशी आपले मजबूत लागेबांधे असल्याची ग्वाहीदेखील देतात. काही सामन्यांच्या टिप्स अशा वेबसाईटवरून दिल्या जात असल्या तरी सामने सुरू असताना सर्वच सामन्यांच्या टिप्स क्षणाक्षणाला देणे शक्य होत नसल्याने फोनद्वारे टिप्स देण्याची सुविधाही या वेबसाईटसवर उपलब्ध असते. या सुविधेद्वारे नाणेफेकीपासून सामन्यापर्यंत आणि संपूर्ण मालिकेच्या भवितव्यापर्यंत सर्वच भाकिते अचूकपणे वर्तविण्याची हमीदेखील दिली जाते. वेबसाईटच्या पेजवरील ऑनलाईन फॉर्म भरून सबमिट करून ही सुविधा मिळविता येते.
म्‘बेटिंगकिंग डॉट इन’ नावाच्या एका वेबसाईटवर ८० ते ९० टक्के अचूक अंदाजांची हमी देण्यात आली आहे. फेसबुकवरदेखील बेटिंगकिंगचे ‘कम्युनिटी पेज’ असून आयपीएल सामन्यांच्या भाकितांसाठी दूरध्वनी क्रमांकदेखील देण्यात आला आहे. आयपीएल सामन्यांकरिता ८० टक्क्य़ांहून अधिक अचूक अंदाज वर्तवून आम्ही तुमचे जीवन सुकर करू शकतो, असा बेटिंगकिंगचा दावा आहे.  
क्रिकेटच्या सट्टेबाजीसाठी टिप्स देणाऱ्या वेबसाईटसप्रमाणेच, क्रिकेट बेटिंगचे सॉफ्टवेअरदेखील मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा इंटरनेटवर उपलब्ध आहे. ‘बी अ बुकी डॉट कॉम’ नावाच्या वेबसाईटवरून फुटबॉल, टेनिस, अश्वशर्यती, आईस हॉकी, ऑलिंपिक बेटिंग, प्रीमियर लीग, अमेरिकन फुटबॉल,ची बेटिंग सॉफ्टवेअर्स मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. ‘बेट३६५ डॉट कॉम’ नावाच्या वेबसाईटने तर, ‘कंप्लीट ऑनलाईन क्रिकेट बेटिंग प्रॉडक्ट’ अशी जाहिरात केली आहे. गुगलच्या सर्च इंजिनवर, क्रिकेट बेटिंग सॉफ्टवेअरची माहिती देणारे तब्बल दोन लाख ४२ हजार निकाल अक्षरश क्षणार्धात समोर येतात, तर क्रिकेट बेटिंगच्या मोफत टिप्स देणारे ५१ लाख ९० हजार रिझल्टस दिसतात. आयपीएल २०१३ च्या सामन्यांच्या टिप्ससंबंधीचे तब्बल २४ लाख रिझल्टस काही सेकंदांतच गुगलच्या सर्च इंजिनवर अवतरतात. क्रिकेट सामन्यांच्या सट्टेबाजीला बंदी असली तरी, त्यावर कोटय़वधींची उलाढाल होते, यासाठी यापेक्षा वेगळ्या तपशीलाची गरज नाही, हे यावरून स्पष्ट झाले आहे.