सलग चार पराभव पदरी पडल्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या संघाने खांदे न पाडता लढा दिला आणि अखेर पाचव्या सामन्यामध्ये त्यांना विजय गवसला. या विजयाचे श्रेय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंगने प्रशिक्षक रिकी पॉन्टिंगच्या सकारात्मक वृत्तीला दिले आहे. स्पर्धेतील पहिलावहिला विजय हा पॉन्टिंगच्या सकारात्मक वृत्तीचा असल्याचे मत हरभजनने व्यक्त केले आहे.
‘‘पॉन्टिंग ही एक सकारात्मक वृत्ती असलेली व्यक्ती आहे. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीवर दृष्टिक्षेप टाकल्यास तुम्हाला ते कळून चुकेलच. सामन्यात विजय मिळो किंवा पराभव तो नेहमीच सकारात्मकच असतो. प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करायला हवी, हे तो सांगत असतो. सलग चार पराभवानंतरही पॉन्टिंग शांत होता. त्याच्या मार्गदर्शनाखाली संघ चांगली कामगिरी करत आहे,’’ असे हरभजन म्हणाला.
पॉन्टिंगबरोबच भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळे यांनाही हरभजनने विजयाचे श्रेय दिले आहे. तो म्हणाला की, ‘‘आम्हाला पॉन्टिंगबरोबर सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेसारखे अनुभवी व जागतिक क्रिकेटचा दांडगा अनुभव असलेले मार्गदर्शक मिळाले आहेत. त्यामुळे या सर्वाच्या मार्गदर्शनाचा संघाला चांगलाच फायदा होत आहे.’’
पोलार्डचे समर्थन
बंगळुरू : तोंडाला टेप लावून खेळणारा वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डचे हरभजन सिंगने समर्थन केले आहे. ‘‘पंचांनी पोलार्डला शांत राहण्यासाठी सांगितले होते. त्यामुळे आपल्याकडून ही चूक पुन्हा घडू नये यासाठी त्याने टेप लावली होती. पोलार्ड एक अवलिया आहे. तो अशा काही गोष्टी करतच आला आहे. आतापर्यंत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये अशा काही गोष्टी करत खेळाचा आनंद लुटला आहे,’’ असे हरभजन म्हणाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यादरम्यान पोलार्ड आणि वेस्ट इंडिजचा तडफदार सलामीवीर ख्रिस गेल यांच्यामध्ये वादावादी झाली होती. त्या वेळी पंचांनी दोन्ही खेळाडूंना शांत राहण्याची ताकीद दिली होती. त्यानंतर पोलार्डने आपल्या तोंडावर टेप बांधत, शांत राहणे पसंत केले होते.