राजस्थान रॉयल्सचा आरामात पराभव करणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आता आयपीएलच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावर विराजमान आहे. आतापर्यंतच्या सात सामन्यांपैकी पाच सामने जिंकण्याची किमया साधणाऱ्या बंगळुरूची स्पध्रेतील वाटचाल ‘रॉयल’ आणि स्वप्नवत अशीच आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक झगडणारा संघ अशी ख्याती असणाऱ्या पुणे वॉरियर्सशी ते मंगळवारी झुंजणार आहेत. बंगळुरूला पुढील सहा सामने इतर संघांच्या मैदानांवर खेळायचे आहेत. बंगळुरूने सनरायजर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांविरुद्धचे त्यांच्या मैदानांवरील सामने गमावले होते. या परिस्थितीत घरच्या मैदानावरील हा सामना जिंकण्याची संधी ते नक्कीच दवडणार नाहीत.
आतापर्यंतच्या आयपीएल हंगामांप्रमाणे यंदाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजे ख्रिस गेलची वादळी फलंदाजी हे समीकरण रूढ झाले आहे. नेमकी हीच गोष्ट बंगळुरूच्या संघासाठी धोकादायक ठरणारी आहे. गेलने ७ सामन्यांत २५७ धावा काढल्या आहेत. नाबाद ९२ ही त्याची या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय १७ षटकार आणि २२ चौकारांची आतषबाजी त्याने केली आहे. गेलशिवाय कप्तान विराट कोहली आणि दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक फलंदाज ए बी डी’व्हिलियर्स हे फलंदाजसुद्धा त्यांच्या दिमतीला आहेत.
गतवर्षी कोहली धावांसाठी झगडत होता. पण या वर्षी तो बहरदार फलंदाजी करीत असून तीन अर्धशतकांसह ३२२ धावा झळकावणाऱ्या कोहलीकडेच सध्या ‘ऑरेंज कॅप’ आहे. मयांक अगरवाल, लोकेश राहुल आणि अरुण कार्तिक यांना मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. त्यामुळे तिलकरत्ने दिलशानला चांगली संधी आहे. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिलशानने विजयाची पायाभरणी करताना गेलसोबत पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची सलामी दिली होती.
विनय कुमार आणि रवी रामपॉल यांनी झहीर खानच्या अनुपस्थितीत बंगळुरूच्या वेगवान माऱ्याची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. मोक्याच्या क्षणी बळी घेत त्यांनी आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. सध्या सर्वाधिक १२ बळींसह ‘पर्पल कॅप’ विनयकडेच आहे.
दुसरीकडे पुणे वॉरियर्सला फलंदाजीच्या चिंतेने ग्रासले आहे. किंग्ज ईलेव्हन पंजाबविरुद्धच्या मागील सामन्यात त्यांच्या याच समस्या समोर आल्या होत्या. युवराज सिंग, रॉबिन उथप्पा, मनीष पांडे, अँजेलो मॅथ्यूज आणि मार्लन सॅम्युएल्स यांच्यात सातत्याचा विलक्षण अभाव जाणवतो आहे. आरोन फिन्चची कामगिरी मात्र लक्षवेधक आहे. त्याने पाच सामन्यांत तीन अर्धशतकांसह २११ धावा केल्या आहेत.
सामन्याची वेळ : दुपारी४ पासून