* पुणे विजयी
* गतविजेत्या कोलकात्याचे बाद फेरीचे दरवाजे बंद
गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या आणि पराभव हीच ओळख झालेल्या पुणे वॉरियर्सने कोलकाता नाइट रायडर्सला पराभवाचा धक्का दिला. मनीष पांडेच्या अर्धशतकाच्या जोरावर पुण्याने १७० धावांचा डोंगर उभारला. युसुफ पठाण आणि रायन टेन डुश्काटाची भागीदारी कोलकाताला जिंकून देणार असे वाटत असतानाच युसुफ पठाण विचित्र पद्धतीने बाद झाला आणि कोलकाताच्या विजयाच्या आशा मावळल्या. पुण्याने गतविजेत्या नाइट रायडर्सवर केवळ ७ धावांनी विजय मिळवला.
या लक्ष्याचा पाठलाग करताना नाइट रायडर्सची ३ बाद २९ अशी अवस्था झाली. यानंतर रायन टेन डुश्काटा आणि युसुफ पठाण यांनी चौथ्या विकेटसाठी ९८ धावांची भागादारी केली. चोरटी धाव घेण्याचा रायनचा प्रयत्न फसला. त्याने ३० चेंडूत ४२ धावा केल्या. मात्र दुसऱ्या बाजूने युसुफने एकाकी झुंज दिली.  ‘ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड’ नुसार बाद होणारा युसुफ ट्वेन्टी-२० क्रिकेटमधला पहिला खेळाडू ठरला. त्याने ४४ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावा केल्या. युसुफ बाद झाल्यानंतर विजयाचे समीकरण नाइट रायडर्ससाठी अधिकच कठीण बनले आणि पुण्याने दुर्मीळ विजय साकारला.
तत्पूर्वी मनीष पांडेच्या अर्धशतकाच्या जोरावर पुणे वॉरियर्सने १७० धावांचा डोंगर उभारला. फिन्चने ४८ धावांची खेळी केली. यानंतर मनीष पांडे आणि युवराज सिंगने तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. पांडेने ४७ चेंडूंत ८ चौकार आणि एका षटकारासह ६६ धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ४ बाद १७० (मनीष पांडे ६६, आरोन फिन्च ४८, सचित्र सेनानायके १/२२) विजयी विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १६३ (युसुफ पठाण ७२, रायन टेन डुश्काटा ४२, वेन पारनेल २/३४).
सामनावीर : मनीष पांडे.