गुणतालिकेत शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळण्यासाठी पुणे आणि दिल्ली संघात मुकाबला होता. घरच्या मैदानावर सांघिक कामगिरीच्या जोरावर पुण्याने दिल्लीवर ३८ धावांनी मात केली आणि शेवटच्या स्थानाची नामुष्की टाळली.  
अँजेलो मॅथ्यूज ,कर्णधार एरॉन फिंच व ल्युक राइट यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर पुणे वॉरियर्सने १७२ धावांचा डोंगर उभारला. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने सातत्याने विकेट्स गमावल्या. त्यांनी १३४ धावांची मजल मारली. अली मूर्तझाने १४ धावांमध्ये तीन बळी घेत पुण्याच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
 कर्णधार एरॉन फिंच (५२) याचे तडाखेबाज अर्धशतक तसेच ल्युक राइट (४४) व अँजेलो मॅथ्यूज (नाबाद ३०) यांनी केवळ ६.१ षटकांत केलेली ७२ धावांची भागीदारी हेच पुण्याच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. राइट व मॅथ्यूज यांची जोडी झकास जमली. त्यांनी चौफेर फटकेबाजी करीत धावफलक सतत हलता ठेवला. त्यांनी १९ व्या षटकांत उमेश यादवच्या गोलंदाजीवर तब्बल २४ धावा वसूल केल्या. राइट याने २३ चेंडूंत ४४ धावा करताना सात चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. मॅथ्यूजने नाबाद ३० धावा करताना दोन षटकार ठोकले. दिल्लीकडून सिद्धार्थ कौल याने प्रभावी कामगिरी करताना २७ धावांमध्ये दोन बळी घेतले.
दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (२) हा तिसऱ्याच षटकांत परतल्यानंतर कर्णधार माहेला जयवर्धने (१४) व भरत चिपली (१६) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र अली मूर्तझा याने सामन्याच्या सहाव्या षटकात जयवर्धने याला बाद केले. पाठोपाठ त्याने सामन्याच्या आठव्या षटकांत वीरेंद्र सेहवाग (११) व भरत चिपली (१६) यांना बाद करीत दिल्लीची ४ बाद ५५ अशी स्थिती केली. दिल्लीच्या पठाण व मुरलीधरन गौतम यांनी जबाबदारीने खेळ करीत डाव सावरला. त्यांनी ४२ चेंडूंत ५४ धावांची भागीदारी करीत संघाच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या होत्या. मात्र मॅथ्यूजने गौतमला बाद करत दिल्लीच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या.
संक्षिप्त धावफलक : पुणे वॉरियर्स २० षटकांत ५ बाद १७२ (एरॉन फिंच ५२, ल्युक राइट ४४, सिद्धार्थ कौल २/२७ विजयी विरुद्ध दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ९ बाद १३४  (मुरलीधरन गौतम ४०, अली मूर्तझा ३/१६)