राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादवर सहा विकेट्स राखून विजय मिळवला तो मुंबईकर खेळाडूंच्या जोरावरच. धवल कुलकर्णी आणि प्रवीण तांबे या दोघांनी प्रत्येकी दोन बळी घेत हैदराबादला अवघ्या १२७ धावांपर्यंत रोखले. अजिंक्य रहाणेच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी तो बाद झाला आणि त्यांना अखेरच्या चेंडूपर्यंत विजयासाठी वाट पहावी लागली.
शिखर धवन (१०) आणि के. एल. राहुल (२) यांना धवल कुलकर्णीने बाद करत हैदराबादची ३ बाद ३५ अशी अवस्था केली. यानंतर नमन ओझा (२५) आणि ईऑन मॉर्गन (२७) या दोघांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, पण या दोघांना तांबेने बाद करत हैदराबादच्या धावांना वेसण घातली.
हैदराबादच्या १२८ धावांचा पाठलाग करताना अजिंक्यने ९ चौकारांच्या जोरावर नाबाद ६१ धावा करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. जेम्स फॉकनरने अखेरच्या चेंडूवर चौकर लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ५ बाद १२७ ( ईऑन मॉर्गन २७; धवल कुलकर्णी २/९, प्रवीण तांबे २/२१) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : २० षटकांत ४ बाद १३१ (अजिंक्य रहाणे ६१; रवी बोपारा २/१८)
सामनावीर : अजिंक्य रहाणे.