*   रोमहर्षक लढतीत पुणे वॉरियर्सवर मात
*   रहाणे, द्रविडची धडाकेबाज अर्धशतके
*   अजिंक्य रहाणे- चेंडू ४८, चौकार ६, षटकार २, ६७ धावा
चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पध्रेसाठी भारतीय संघात स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणेने जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पुणे वॉरियर्सच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. कप्तान राहुल द्रविडनेही त्याला सुरेख साथ दिली. रहाणे-द्रविड जोडीने ९८ धावांची दमदार सलामी नोंदवली. त्यामुळेच राजस्थान रॉयल्सने आयपीएल क्रिकेट स्पध्रेतील रंगतदार लढतीत पुणे वॉरियर्सचा पाच विकेट आणि एक चेंडू राखून पराभव केला.
द्रविडने ४० चेंडूंत ९ चौकार आणि एक षटकारासह ५८ धावा केल्या, तर रहाणेने ४८ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांनिशी ६७ धावा केल्या. हे महत्त्वाचे फलंदाज बाद झाल्यानंतर हाच कित्ता गिरवला तो स्टुअर्ट बिन्नीने. त्याने फक्त १३ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ३२ धावा केल्या आणि राजस्थानचा विजय आवाक्यात आणला.
त्याआधी, रॉबिन उथप्पाचे (५४) शैलीदार अर्धशतक व त्याने कर्णधार आरोन फिन्च (४५) याच्या साथीने सलामीसाठी ९७ धावांची आक्रमक खेळी केली. त्यामुळेच पुणे वॉरियर्सला राजस्थान रॉयल्सपुढे १७९ धावांचे आव्हान ठेवता आले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय सार्थ ठरविताना कर्णधार फिन्च व उथप्पा यांनी मनमुरादपणे फटकेबाजी केली. फटके मारण्याच्या प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घेत त्यांनी षटकामागे दहा धावांचा वेग ठेवला. संघाच्या धावांचे अर्धशतक त्यांनी केवळ पाच षटकांत पार केले. त्यांच्या चौफेर टोलेबाजीपुढे राजस्थानच्या गोलंदाजांची पुरती दमछाक झाली. ही जोडी शतक पूर्ण करणार असे वाटत असतानाच केव्हॉन कुपर याने फिन्चचा त्रिफळा उडवित ही जोडी फोडली. फिन्चने ३२ चेंडूंमध्ये सात चौकारांसह ४५ धावा केल्या. उथप्पाने आठ चौकार व एक षटकारासह ५४ धावा केल्या. त्यानंतर खेळाची सूत्रे आपल्याकडे घेत मिचेल मार्शने आक्रमक खेळ केला. त्याने १९व्या षटकांत कुपरला दोन षटकार ठोकले. त्याने २१ चेंडूंत नाबाद ३५ धावा करताना दोन चौकार व तीन षटकार अशी आतषबाजी केली. त्याने अँजेलो मॅथ्यूज (१८) सोबत केवळ ४.२ षटकांत ४१ धावांची भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक
पुणे वॉरियर्स : २० षटकांत ४ बाद १७८ (आरोन फिन्च ४५, रॉबिन उथप्पा ५४ , युवराज सिंग १५, मिचेल मार्श नाबाद ३५, अँजेलो मॅथ्यूज १८; सिद्धार्थ त्रिवेदी १/३३) पराभूत वि. राजस्थान रॉयल्स : १९.५ षटकांत ५ बाद १८२ (राहुल द्रविड ५८, अजिंक्य रहाणे ६७, स्टुअर्ट बिन्नी नाबाद ३२; वेन पार्नेल ३/२७)
सामनावीर : अजिंक्य रहाणे.