आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेतील साखळीच्या अखेरच्या टप्प्यात आता सनरायझर्स हैदराबादने जोरदार मुसंडी मारून आपले आव्हान टिकवले आहे. आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद तिसऱ्या स्थानावर आहे, तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पाचव्या. मात्र फक्त एका गुणाचा फरक दोन्ही संघांमध्ये आहे आणि दोघांचेही दोन सामने बाकी आहेत. त्यामुळे बंगळुरूचा संघसुद्धा तितक्याच आवेशाने आता खेळत आहे. त्यामुळे उप्पल येथे शुक्रवारी होणारा सामना रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचा हेन्रिक्स अष्टपैलू करामत दाखवत आहे. त्याने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध नाबाद ७४ धावांची सामना जिंकून देणारी खेळी साकारली होती, तर पंजाबविरुद्ध १६ धावांत ३ बळी घेत गोलंदाजीत कर्तृत्व दाखवले होते. हैदराबादच्या वेगवान माऱ्याची धुरा ट्रेंट बोल्टवर आहे.
ख्रिस गेलच्या फलंदाजीची दहशत मात्र सर्वच प्रतिस्पर्धी संघांवर असते. याशिवाय कोहली आणि ए बी डी’व्हिलियर्स असे एकापेक्षा एक स्फोटक फलंदाज त्यांच्याकडे आहेत. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कसुद्धा आपला यथोचित प्रभाव पाडत आहे.
*  सामन्याची वेळ : रात्री ८ पासून.
*  थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.