अडखळत्या सुरुवातीनंतर लय गवसलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आता बाद फेरीत प्रवेशाच्या ध्येयाने खेळत आहे. या मोहिमेत बुधवारी त्यांना दमदार विजयाची संधी आहे. विराट कोहली आणि एबी डी’व्हिलियर्स यांच्यावर बंगळुरूच्या फलंदाजीची भिस्त आहे. दोघेही सातत्याने धावा करत आहेत, मात्र आता या दोघांकडून मोठय़ा खेळीची अपेक्षा आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत बंगळुरूने ख्रिस गेलला विश्रांती देण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. गेलच्या अनुपस्थितीत निक मॅडिन्सनला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे पंजाबविरुद्ध गेल अंतिम अकरात खेळण्याची शक्यता आहे. चेन्नईविरुद्ध सुस्थितीत असतानाही, विराट कोहली धावचीत झाल्यानंतर बंगळुरूने २७ धावांत ६ विकेट्स गमावल्या. या चुकांमधून शिकण्याची बंगळुरूला आवश्यकता आहे. दिनेश कार्तिक, युवा सर्फराझ खान, मनदीप सिंग यांच्याकडून संयमी खेळीची अपेक्षा आहे. कोहलीला अन्य खेळाडूंची साथ लाभल्यास बंगळुरूची फलंदाजी मजबूत होऊ शकते.
मिचेल स्टार्कच्या समावेशानंतर बंगळुरूची गोलंदाजी सक्षम झाली आहे. घोटीव यॉर्करसह मारा करणारा मिचेल स्टार्क बंगळुरूचा आधारस्तंभ आहे. त्याला वरुण आरोन आणि हर्षल पटेल यांची उत्तम साथ मिळते आहे. डेव्हिड वाइसचा अष्टपैलू खेळ बंगळुरुसाठी उपयुक्त ठरला आहे. युझवेंद्र चहलची फिरकी पंजाबसाठी डोकेदुखी ठरू शकते.
बाद फेरीत केवळ अव्वल चार संघच खेळू शकतात. चौथ्या स्थानासाठी बंगळुरू, कोलकाता, मुंबई या संघांमध्ये जोरदार मुकाबला रंगणार आहे. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या पंजाबवर दमदार विजय मिळवत दमदार आगेकूच करण्यासाठी बंगळुरूचा संघ आतूर आहे. पंजाबसाठी विजय सन्मान वाचवणारा असेल. असंख्य प्रतिभवान खेळाडू असूनही, पंजाबला सातत्याने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. मुरली विजय आणि वीरेंद्र सेहवाग या अनुभवी खेळाडूंनी सपशेल निराशा केली आहे. डेव्हिड मिलर, ग्लेन मॅक्सवेल आणि शॉन मार्श यांच्यापैकी एकालाही मोठी खेळी करता आलेली नाही. जॉर्ज बेलीने एकटय़ाने फलंदाजीची धुरा वाहिली आहे. त्याला अन्य खेळाडूंची साथ मिळणे आवश्यक आहे. अक्षर पटेलचा अष्टपैलू खेळ या हंगामात बहरलेला नाही. संदीप शर्मा आणि अनुरीत सिंग या भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला आहे. मात्र अनुभवी मिचेल जॉन्सनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. परविंदर अवानाला संधी मिळू शकते. पंजाबला एका विशेषज्ञ फिरकीपटूची उणीव भासते आहे.

किंग्स इलेव्हन पंजाब
जॉर्ज बेली (कर्णधार), अनुरीत सिंग, परविंदर अवाना, रिशी धवन, योगेश गोळवलकर, गुरकीरत सिंग मान, ब्युआन हेन्ड्रिंक्स, मिचेल जॉन्सन, करनवीर सिंग, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, निखील नाईक, अक्षर पटेल, थिसारा परेरा, वृद्धिमान साहा, संदीप शर्मा, वीरेंद्र सेहवाग, शिवम शर्मा, शार्दूल ठाकूर, मुरली विजय, मनन व्होरा.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
विराट कोहली (कर्णधार), ख्रिस गेल, एबी डी’व्हिलियर्स, वरुण आरोन, सीन अबॉट, अबू नेचिम, सुब्रमण्यम बद्रीनाथ, शिशिर बावणे, मनविंदर बिस्ला, युझवेंद्र चहल, अशोक दिंडा, इक्बाल अब्दुल्ला, दिनेश कार्तिक, सर्फराझ खान, निक मॅडिसन, मनदीप सिंग, अ‍ॅडम मिलने, हर्षल पटेल, रिले रोसू, डॅरेन सॅमी, संदीप वॉरियर, जलाज सक्सेना, मिचेल स्टार्क, योगेश ताकवले, डेव्हिड वाइज, विजय झोल.

थेट प्रक्षेपण : सोनी मॅक्स, सोनी सिक्स
सामन्याची वेळ : रात्री ८ पासून