* बंगळुरूची हैदराबादवर सात विकेट्सनी मात
* विराट कोहलीची नाबाद ९३ धावांची खेळी
कर्णधार विराट कोहलीने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत हैदराबाद सनरायझर्सचे आव्हान सहज पार करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ‘विराट’ विजय मिळवून दिला. कोहलीच्या नाबाद ९३ धावांच्या शानदार खेळीमुळे हैदराबादचे १६२ धावांचे उद्दिष्ट तीन विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण करून बंगळुरूने हैदराबादचा विजयरथ रोखला.
दोन दिवसांपूर्वी हैदराबादकडून ‘सुपर-ओव्हर’मध्ये पत्करलेल्या पराभवाचा वचपा बंगळुरूने अखेर मंगळवारी घेतला. कोहलीने ४७ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांची बरसात करत बंगळुरूला एकहाती विजय मिळवून दिला. १६व्या षटकांत अमित मिश्राला चांगलाच चोप देत २१ धावा वसूल केल्यानंतर बंगळुरूने सामना आपल्या पारडय़ात झुकवला. त्यानंतरच्या थिसारा परेराच्या षटकांत १६ धावा वसूल करून बंगळुरूने विजयाच्या दिशेने कूच केली. कोहलीने चौथ्या विकेटसाठी मोझेस हेन्रिक्ससह ६६ धावांची अभेद्य भागीदारी रचली. त्यात हेन्रिक्सचे योगदान होते फक्त सात धावांचे.
मयांक अगरवालने हनूमा विहारीच्या पहिल्याच षटकात एक चौकार आणि षटकार लगावत बंगळुरूला सुरेख सुरुवात करून दिली. इशांत शर्माच्या षटकांत १५ धावा चोपून काढल्यानंतर आक्रमक फटकेबाजी करण्याच्या नादात अगरवालने (२९) परेराच्या गोलंदाजीवर कुमार संगकाराकडे झेल दिला. इशांत शर्माने धोकादायक ख्रिस गेलचा (१३) अडसर दूर केला. कोहली आणि एबी. डी’व्हिलियर्स (१५) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४९ धावांची भर घालून बंगळुरूचा डाव सावरला. त्यानंतर कोहलीने हैदराबादच्या सर्व गोलंदाजांवर हल्ला चढवून बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
तत्पूर्वी, कॅमेरून व्हाइट आणि थिसारा परेरा यांनी अखेरच्या पाच षटकांत केलेल्या घणाघाती खेळीमुळे हैदराबाद सनरायझर्सने २० षटकांत ६ बाद १६१ अशी मजल मारली. व्हाइट-परेरा जोडीने ७.२ षटकांत ८० धावांची भागीदारी रचत हैदराबादला मजबूत स्थितीत आणून ठेवले होते. व्हाइटने तीन चौकार आणि तीन षटकारांची आतषबाजी करत ३४ चेंडूत ५२ धावा तडकावल्या. परेराने एक चौकार आणि चार उत्तुंग षटकार लगावत अवघ्या २४ चेंडूत ४० धावांची लयलूट केली. हैदराबादने अखेरच्या सहा षटकांमध्ये ७७ धावा वसूल केल्या.
हैदराबादची सुरुवात चांगली झाली नव्हती. अक्षत रेड्डी (१२), पार्थिव पटेल (२०) आणि कर्णधार कुमार संगकारा (२३) या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. १०.२ षटकांत हैदराबादची ३ बाद ६२ अशी स्थिती असताना व्हाइट आणि परेरा यांनी सुरुवातीला धोके पत्करले नाहीत. पण मैदानावर स्थिरावल्यानंतर त्यांनी बंगळुरूच्या प्रत्येक गोलंदाजावर हल्ला चढवला. मोझेस हेन्रिक्सच्या १६व्या षटकांत या दोघांनी १८ धावा वसूल केल्या. त्यानंतरच्या षटकांत विनय कुमारला चांगलाच चोप देत व्हाइट-परेरा यांनी १९ धावा काढल्या.
बंगळुरूकडून रुद्रप्रताप सिंग सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने २७ धावांत तीन विकेट्स मिळवल्या. विनय कुमार, मुथय्या मुरलीधरन आणि मुरली कार्तिक यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
संक्षिप्त धावफलक : हैदराबाद सनरायझर्स- २० षटकांत ६ बाद १६१ (कॅमेरून व्हाइट ५२, थिसारा परेरा ४०, कुमार संगकारा २३; रुद्रप्रताप सिंग ३/२७) पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- १७.४ षटकांत ३ बाद १६२ (विराट कोहली नाबाद ९३, मयांक अगरवाल २९; कॅमेरून व्हाइट १/१४).
सामनावीर : विराट कोहली.
डॅरेन सॅमी, हैदराबाद सनरायर्झसचा खेळाडू
हैदराबाद सनरायझर्सचा मंगळवारचा दिवस कठीण होता. मात्र या पराभवाने निराश होण्याचे कारण नाही. पुढच्या सामन्यात अधिक जोमाने आम्ही मैदानावर उतरू.