‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांनी क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांना अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी देशभरात ‘झाडाझडती’ सुरू होती. तामिळनाडू पोलिसांच्या धाडसत्रात सहा सट्टेबाजांना अटक करण्यात आली आहे. याचप्रमाणे तुरुंगात असलेल्या क्रिकेटपटू आणि सट्टेबाजांच्या चौकशीत आणखी काही खेळाडूंची नावे समोर येण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तिघांनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. परंतु श्रीशांत आणि चंडिलाच्या वकिलांनी मात्र हे खेळाडू निर्दोष असल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आणखी काही सामन्यांत ‘स्पॉट-फिक्सिंग’ झाल्याची शक्यता असून, पोलीस याप्रकरणी कसून चौकशी करीत आहेत.